अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात असलेल्या एनन्सिएशन कॅथोलिक स्कूलमध्ये बुधवारी सकाळी गोळीबार झाला. या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला असून, २० लोक जखमी झाले आहेत. मृत पावलेल्यांमध्ये हल्लेखोराचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, विद्यार्थी सकाळी प्रार्थनेसाठी एकत्र आले असतानाच हा हल्ला झाला. ही शाळा एका चर्चशी संबंधित असून, मिनियापोलिसच्या दक्षिण-पूर्व भागात आहे. या शाळेत प्री-स्कूलपासून आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात आणि सुमारे ३९५ विद्यार्थी येथे दाखल आहेत.
अधिकाऱ्यांनी व्यक्त केला संताप
मिनेसोटा राज्याचे गव्हर्नर टिम वाल्ज यांनी या घटनेला 'भयंकर' म्हटले. ते म्हणाले, "हा आपल्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी खूप वेदनादायी क्षण आहे. शाळेच्या पहिल्या आठवड्यातच त्यांना या हिंसेला सामोरे जावे लागले." त्यांनी पीडितांसाठी प्रार्थना केली. घटनेनंतर पोलीस, एफबीआय, फेडरल एजंट्स आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या.
मिनियापोलिस शहराचे महापौर जेकब फ्रे यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, "या घटनेची कल्पना करणेही कठीण आहे. या घटनेचे भयाण वास्तव शब्दांत मांडणे शक्य नाही. हे कोणाचे तरी मूल नाही, तर ते आपलेच मूल आहे असे समजून याकडे बघा."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. 'व्हाइट हाऊस या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे,' असे त्यांनी सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर 'एफबीआयने तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली आहे. या घटनेतील सर्वांसाठी मी प्रार्थना करतो,' असे लिहिले.
मिनियापोलिसमध्ये २४ तासांत चार घटना
गेल्या २४ तासांत मिनियापोलिस शहरात झालेली ही चौथी मोठी हिंसक घटना आहे. मंगळवारी दुपारी एका हायस्कूलबाहेर झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि सहा जण जखमी झाले होते. त्यानंतर रात्री झालेल्या दोन वेगळ्या घटनांमध्येही दोघांचा मृत्यू झाला होता.