एकीकडे पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतासोबतचा तणाव वाढला असतानाच आज बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानच्या सैन्यावर एक मोठा हल्ला झाला. पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सैन्याचं वाहन नियमित गस्तीसाठी जात असताना हा हल्ला झाला. सैन्याच्या वाहनाला लक्ष्य करून करण्यात आलेला स्फोट एवढा शक्तिशाली होता की त्यात वाहनाच्या पूर्णपणे चिंधड्या उडाल्या.
या स्फोटात जखमी झालेल्यांना नजीकच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र हा भाग बंडखोरांच्या कारवायांमुळे बऱ्याच काळापासून अशांत राहिलेला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीएलएने पाकिस्तानी सैन्याला इशारा देताना येत्या काही दिवसांत आणखी हल्ले तीव्र होतील, अशी धमकी दिली होती. आमच्या स्वातंत्र्याची लढाई थांबणार नाही, आम्ही आमच्या शत्रूंना पूर्ण शक्तीनिशी लक्ष्य करत राहू, असा इशाराही त्यांनी दिला होता.