इस्लामाबाद : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाचे पडसाद आता पाकिस्तानच्या सत्तावर्तुळात उमटू लागले आहेत. कोलंबोतील पराभवानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ केवळ ११४ धावांवर गडगडला. या लाजीरवाण्या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. मोहसीन नकवी हे सध्या पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत आणि त्यांच्याकडे पीसीबीची धुरा आहे. मात्र, संघात शिस्त नसल्याचे आणि तयारी न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत आहे.
पाकिस्तानमध्ये संतापाची लाटकेवळ लष्करच नव्हे, तर पाकिस्तानची जनता आणि माजी क्रिकेटपटूंनीही या पराभवाचे खापर बोर्डाच्या चुकीच्या नियोजनावर फोडले आहे. भारताने ज्या पद्धतीने एकतर्फी विजय मिळवला, त्यावरून पाकिस्तान क्रिकेटची ढासळलेली स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
नक्वी यांनी ना टीम, ना सरकार ना असीम मुनीर भारताला घाबरत, असे वक्तव्य केले होते. यावरून भारत-पाकिस्तान सामन्यासाठीच्या वादात माझे नाव का घुसडण्यात आले म्हणून मुनीर नाराज आहेत. राजकारण, दोन देशांमधील परिस्थिती इथपर्यंत ठीक होते. आपले नाव यात घेतले गेल्याने मुनीर यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. या प्रकारामुळे मुनीर यांच्यासाठीही ही लाजीरवाणी बाब ठरू लागली आहे. त्यात भारतासोबत सामना खेळायची की नाही याबाबत नक्वी यांनी मुनीर यांची संमती घेतली नव्हती असाही दावा केला जात आहे. एकंदरीतच नक्वी यांच्या खूर्चीवर हे प्रकरण शेकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.