सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अध्यक्षपदाची शपथ घेत डोनाल्ड ट्रम्प हे अधिकृतरीत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान, ट्रम्प यांनी पहिला मोठा धक्का हा हा अमेरिकेचे दोन शेजारी देश अललेल्या कॅनडा आणि मेक्सिको यांना दिला आहे.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे ओव्हल ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आपलं वर्षभरासाठीचं व्हिजन सादर केलं. जगाने आपल्याला शांतिदूत म्हणून ओळखावं, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, मी शपथ घेतल्यापासून अमेरिकेच्या पतनाचा काळ संपुष्टात आला आहे. मात्र आता इथपासूनच अमेरिकेच्या विकासाची कहाणी सुरू होत आहे.
ते पुढे म्हणाले की, मी अशी अमेरिका बनवू इच्छित आहे जी इतर जगाच्या तुलनेत खूप पुढे असेल. मी अमेरिकेला पुन्हा एकदा श्रीमंत, विकसित आणि महान बनवू इच्छितो.
दरम्यान, अमेरिकेच्या विकासासाठी ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के टॅरिफ लावू शकतो. मात्र हा निर्णय सुमारे १० दिवसांनंतर १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या मालावर व्यावसायिकांना २५ टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे.
जर ट्रम्प यांनी हा निर्णय लागू केला तर अमेरिका आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये व्यापारी युद्ध सुरू होऊ शकतं. त्याचं कारण म्हणजे कॅनडाने अमेरिकेसोबत आपले संबंध सामान्य पातळीवर राहावेत असं सांगितलं असलं तरी ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्यास कॅनडा आणि मेक्सिकोच्या सरकारांनाही हे पाऊल उचलावं लागेल