पर्यटन करताना पर्यटनस्थळाइतकंच महत्त्व प्रवासालाही असतं. पण हल्ली नियोजित ठिकाणी पोहोचण्याचा प्रवास केला नाही तर उरकला जातो. थोडे पैसे जातात पण वेळ वाचतो, असा व्यावहारिक विचार करुन बस, रेल्वे प्रवास टाळून विमान प्रवास अनेकांना सोयीचा वाटतो. असा कोरडा प्रवास बेल्जियमच्या २५ वर्षीय लुना बटियन्सला नको होता. तिला अमेरिका पाहायची होती. पण प्रवासातली माणसं, प्रवासातले क्षण या सगळ्यांसह!
तिच्या लेखी अमेरिका पाहणं जितकं महत्त्वाचं होतं तितकाच ती पाहण्यासाठी करावा लागणारा प्रवासही. यासाठी लुनाने विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करत अमेरिका पाहण्याचं ठरवलं.
लुनाने ॲमट्रॅक या रेल्वेचा पास काढला. या पासद्वारे एकमार्गी प्रवासात ३० दिवसांत १० शहरं पाहण्याची मुभा असते. ४९९ अमेरिकन डॉलर्स (म्हणजे ४२,७९५ रुपये) खर्चून आपण स्वत:ला जिवंत करणारा अमूल्य प्रवास केला असं लुना म्हणते. ती २०२४ पासून न्यूयॉर्कस्थित बेल्जियन वफल कंपनीत काम करते आहे.
बेल्जियमला घरी जाण्यापूर्वी तिला अमेरिका नुसती बघायची नव्हती तर अनुभवायची होती. यासाठी रेल्वेने प्रवास तिला उत्तम मार्ग वाटत होता. न्यूयाॅर्क शहरातून २८ जानेवारीला लुनाचा प्रवास सुरु झाला. या प्रवासादरम्यान तिला येत असलेले अनुभव ती डायरीत लिहून ठेवत होती.
आपण कुठे आहोत याचं भान सतत देणाऱ्या रेल्वेने प्रवास करताना लुना घड्याळाकडे पाहून वेळ मोजत नव्हती. तिच्यालेखी प्रवासात वेळ अस्तित्वातच नव्हता. त्यामुळे मोबाइल, लॅपटाॅपमध्ये डोकं खुपसून तिने तो ‘घालवला’ नाही. डब्यात तिच्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे बघत, त्यांच्याशी बोलत, त्यांच्याशी पत्ते खेळत तिचा प्रवास मजेशीर सुरू होता.
तासनतास छोट्याशा सीटवर बसून प्रवास करणं शरीराला थोडं त्रासदायक होतं. तरीही प्रवासात पाय लांब करायला मिळत होते, पाठ टेकवायला मिळत होती यात लुना खुश होती. सलग अनेक रात्र रेल्वेत बसून प्रवास केल्याने तिची पाठ दुखू लागली. पण हरवलेल्या वर्तमानाशी गाठ घालून देणारा हा रेल्वे प्रवास लुनाला खूप आनंददायी वाटत होता.
या प्रवासात लुना मियामी, वॉशिंग्टन डी.सी., शिकागो, डेनव्हर, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, सॅन डिएगो, न्यू ऑरलन्स अशा विविध शहरात फिरली. अमेरिकेतली जी जी स्थळं पाहिली ती खूप सुंदर आणि आकर्षक होती. सोबतच त्या जागेवर भेटणारी माणसंही त्या जागांप्रमाणेच सुंदर होती असं लुनाला जाणवत होतं.
पर्यटन स्थळ म्हणजे विशिष्ट जागा किंवा तिथे पोहोचविणारा रस्ता नव्हे. त्या जागेला आपलं घर मानणाऱ्या, आलेल्या प्रत्येकाशी प्रेमाने वागणाऱ्या माणसांकडे बघण्याची नजर आपल्याला या प्रवासाने दिली असं लुना म्हणते. रेल्वेतल्या खिडक्यांनी आपल्याला जी अमेरिका दाखवली ती विमानात बसून नक्कीच दिसली नसते असं लुना म्हणते.
प्रवास तीस दिवसात संपणार नाही असं लक्षात आल्यावर लुनाने आणखी काही दिवसांचं तिकीट काढलं आणि ४ मार्च २०२५ रोजी ती पुन्हा न्यूयाॅर्कमध्ये पोहोचली. पाठीवर एक बॅकपॅक घेऊन सोलो ट्रॅव्हलर म्हणून अमेरिका बघायला निघालेल्या लुनाने रेल्वे प्रवासातील असंख्य आठवणी मनात भरुन आणल्या आहेत.