नेपाळमध्ये Gen- Z ने सरकारविरोधात मोठे आंदोलन केले. हे आंदोलन सोशल मीडिया बंदीविरोधात होते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मंगळवारी परिस्थिती इतकी बिकट झाली होती. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली. सरकारी इमारती, नेत्यांच्या घरांवर आणि अगदी पशुपतिनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरही हल्ला करण्यात आला. दरम्यान, आता नेपाळच्या लष्कर रस्त्यावर उतरले आहे.
सोशल मीडियावरील बंदी उठवण्यात आली, पण १९ जणांच्या मृत्यूने आगीत तेल ओतले. हिंसक निदर्शने पाहून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला, पण निदर्शक अजूनही शांत झालेले नाहीत. यामुळे आता सैन्य तैनात करावे लागले आणि परिस्थिती अजूनही नियंत्रणाबाहेर आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
हे निदर्शने अचानक उद्भवली नाहीत. नेपाळ बऱ्याच काळापासून भ्रष्टाचार आणि राजकीय खेळांना बळी पडला आहे. याला जनता, नवीन पिढी, कंटाळली होती. सोशल मीडियावरील बंदीमुळे त्यांचा संताप आणखी वाढला. सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला.
यानंतर, मंगळवारी निदर्शने अधिक हिंसक झाली. माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकर यांना जिवंत जाळण्यात आले.
लष्कराचे शांततेचे आवाहन
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून नेपाळच्या लष्कराने सूत्रे हाती घेतली. मंगळवारी रात्रीपासून लष्कराने काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सिंह दरबारसारख्या महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांचा ताबा घेतला. लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी व्हिडीओ स्टेटमेंटद्वारे निदर्शकांना शांततेचे आवाहन केले. "आपल्याला या कठीण काळातून एकत्रितपणे देशाला बाहेर काढायचे आहे. हिंसाचारामुळे फक्त नुकसानच होईल. संवादाचा मार्ग स्वीकारा', असे आवाहन त्यांनी केले.
जनरल सिग्देल यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली. पण अजूनही स्त्यांवरील संताप कमी होत झालेला नाही. हजारो निदर्शक अजूनही रस्त्यावर आहेत, रस्ते अडवले आहेत आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले सुरूच आहेत.
लष्कराच्या हेलिकॉप्टरने काही मंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले, पण परिस्थिती अजूनही नाजूक आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही निदर्शकांना शांतता आणि संवादाचे आवाहन केले.