India Bangladesh Relationship: बांगलादेशात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मुहम्मद युनूस यांचे हंगामी सरकार बांगलादेशात कार्यरत आहे. या सरकारची भूमिका काही वेळा भारतविरोधी असल्याचे दिसून आले आहे. पण आता मात्र भारतासाठी बांगलादेशातून एक चांगली बातमी मिळत आहे. भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकणाऱ्या दोन बांगलादेशी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी दोन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.
भारतविरोधी २ मंत्र्यांची हकालपट्टी
बांगलादेशच्या हंगामी सरकारमध्ये अस्थिरतेचे सावट आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने त्यांना पॅकेजमधील मोठी रक्कम देण्यास नकार दिला आहे. बांगलादेशात निवडणुकीच्या माध्यमातून स्थिर सरकार स्थापन झाल्यावरच त्यांना पॅकेजचा पुढचा हप्ता मिळणार आहे. तशातच आता बांगलादेशने भारतविरोधी मंत्र्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. ज्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत त्यांची नावे महफुज आलम आणि आसिफ महमूद आहेत.
महफूज आणि आसिफ कोण आहेत?
बांगलादेशात सध्या हंगाम सरकार असल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सल्लागार म्हटले जाते. महफुज आलम हे युनूस यांचे निकटवर्तीय मानले जातात. विद्यार्थी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते असा त्यांचा उल्लेख केला जातो. महफुज यांना ऑगस्ट २०२४ मध्ये युनूस यांचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. महफुज यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे. महफुज आलम भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकताना दिसतात. महफुज हे आता नाहिद इस्लामच्या पक्षात सामील होत असल्याचे सांगितले जात आहे.
आसिफ महमूद यांच्याकडे मंत्रिमंडळात युवा आणि क्रीडा मंत्रालय आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी झालेल्या विद्यार्थी चळवळीत आसिफ यांचा मोठा वाटा होता. आसिफने अधूनमधून भारतावर टीका केली आहे. अलिकडेच आसिफने दावा केला होता की बांगलादेश सरकारने भारतासोबतचे सर्व प्रकल्प रद्द केले आहेत. त्यानंतर युनूस सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांना आसिफचा दावा फेटाळण्यासाठी पुढे यावे लागले होते.
निवडणुकीपूर्वी दोघांवरही कारवाई
बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी जे मंत्री तटस्थ नाहीत त्यांना बाहेर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आसिफ आणि महफुज हे भारतासोबतच स्थानिक पक्षांविरुद्धही आवाज उठवत आहेत. युनूस यांचे अंतरिम सरकार निवडणुकीदरम्यान बदनाम होऊ इच्छित नाही. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.