अमेरिकेने निर्बंध लादलेल्या दोन देशांनी युती केली असून मोठी डील पूर्णत्वास नेली आहे. यामुळे भारताचा फायदाच फायदा होणार आहे. रशिया आणि इराण रश्त- अस्तारा रेल लिंक बनविण्यासाठी एकत्र येत आहेत. ही रेल्वे लाईन थेट भारतापर्यंत जोडली जाणार आहे. यामुळे भारताला रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा, शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यासह अन्य गोष्टींची ने-आण खूप सोपी होणार आहे.
रशिया आणि इराण या देशांवर अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. या दोन्ही देशांनी इन्स्टकच्या (INSTC) रश्त आणि अस्ताराला जोडणाऱ्या रेल लिंकवर सहकार्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. मार्चच्या अखेरीस या करारावर सह्या होणार आहेत. इन्स्टकचा अर्थ इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर असा आहे. या करारावर १७ जानेवारीला क्रेमलीनमध्ये पुतीन आणि इराणचे राष्ट्रपती एम पेजेशकिन यांच्यात सहमती झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
रशियाहून मालवाहतूक करण्यासाठी सध्या भारताला दोन मार्ग आहेत, जे अख्ख्या युरोपला वळसा घालून जातात. परंतू, मुंबई बंदराहून इराणचे चाबहार बंदर, तिथून रेल्वेमार्गाने थेट रशिया असा हा नवा मार्ग असणार आहे. रश्त-अस्तारा हा १६२ किमींचा रेल्वेमार्ग आहे. रश्त हे इराणमध्ये आहे, ते अझरबैजानच्या अस्ताराला(कॅप्सिकन समुद्र किनाऱ्यावरील शहर) याला रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे.
रशिया भारताच्या अगदी जवळ असला तरी हिमालयामुळे या भागातून मार्ग काढणे अशक्य आहे. यामुळे भारताला समुद्रमार्गे वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत होते. आता मुंबई बंदर ते चाबहार बंदर एवढाच समुद्र मार्ग असणार आहे. यामुळे वाहतूक प्रचंड वेगाने होणार आहे.
रशिया या प्रकल्पासाठी इराणला १.३ अब्ज रुपये देणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प १.६ अब्ज रुपयांचा आहे. हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. भारतासाठी मुंबई बंदर-चाबहार बंदर-रश्त-अस्तारा-मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग असा हा मार्ग असणार आहे.