"अमेरिकेने आपला नेहमीच वापर करून घेतला. अफगाणिस्तान युद्धाच्या नावाखाली आपल्या लोकांना जिहादच्या नावावर मरण्यासाठी पाठवले आणि काम फत्ते झाल्यावर आपल्याला वाऱ्यावर सोडून दिले. अमेरिकेने पाकिस्तानचा वापर एखाद्या 'टॉयलेट पेपर'सारखा केला आणि नंतर फेकून दिले," अशा अत्यंत जहाल आणि अपमानजनक शब्दांत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत अमेरिकेवर हल्ला चढवला आहे.
रशियाविरुद्धची लढाई 'जिहाद' नव्हताच!
नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या जुन्या धोरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, १९८० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये रशियाविरुद्ध जे बंड झाले, ते अमेरिकेच्या सांगण्यावरून करण्यात आले होते. "त्यावेळी रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता, तर तिथल्या सरकारने त्यांना बोलावले होते. तरीही आपण अमेरिकेच्या स्वार्थासाठी त्यात उडी घेतली. त्याला जिहाद नाव दिले गेले, पण तो जिहाद नव्हताच. ती आमची सर्वात मोठी चूक होती," अशी कबुलीच आसिफ यांनी दिली.
मुशर्रफ आणि झिया-उल-हक यांच्यावर खापर
पाकिस्तानच्या या दुर्दशेसाठी ख्वाजा आसिफ यांनी माजी लष्करी हुकूमशहा जनरल झिया-उल-हक आणि परवेझ मुशर्रफ यांना जबाबदार धरले. "२००१ मध्ये आम्ही पुन्हा तीच चूक केली. अमेरिकेसाठी आम्ही तालिबानच्या विरोधात उभे राहिलो. अमेरिकेला आम्ही आमची हवाई हद्द दिली, कराची बंदर दिले आणि माणसंही दिली. आज अमेरिका निघून गेली आहे, पण त्याचे नुकसान आपण आजही भोगत आहोत, ज्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही," असेही ते म्हणाले.
दहशतवादाचा डंख आणि अफाट नुकसान
इस्लामाबादमधील मशिदीवर झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर संरक्षण मंत्र्यांचे हे विधान आले आहे. या हल्ल्यात ३० हून अधिक निष्पापांचा बळी गेला, ज्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानला जबाबदार धरले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आकडेवारीनुसार, या अमेरिकन युद्धांच्या नादात पाकिस्तानने आपले ७५,००० नागरिक गमावले असून, देशाचे १२३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. त्याबदल्यात अमेरिकेने पाकिस्तानला केवळ २० अब्ज डॉलर्सची तुटपुंजी मदत दिली. पाकिस्तानी संसदेतील या विधानामुळे आता जागतिक स्तरावर, विशेषतः अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Pakistani Defence Minister accuses US of exploiting Pakistan like a 'toilet paper' during Afghan war, leaving it devastated. He blamed past leaders for aligning with US interests, resulting in immense loss of life and economic damage, with minimal compensation.
Web Summary : पाकिस्तानी रक्षा मंत्री ने अमेरिका पर अफगानिस्तान युद्ध में पाकिस्तान का 'टॉयलेट पेपर' की तरह इस्तेमाल करने का आरोप लगाया, जिससे देश तबाह हो गया। उन्होंने अतीत के नेताओं को अमेरिकी हितों के साथ गठबंधन करने के लिए दोषी ठहराया, जिसके परिणामस्वरूप भारी जानमाल और आर्थिक नुकसान हुआ।