Donald Trump Warns Iran:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी इराणने अमेरिकन लष्कराच्या कतार येथील तळांवर क्षेपणास्त्र डागले. हे युद्ध आता कोणत्या वळवणार जाणार, याकडे जगाचे लक्ष लागले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केला. परंतु, यानंतर काही तासात स्थिती पुन्हा जैसे थे झाली. यानंतर आता मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे, असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धविराम जाहीर करत केलेली मध्यस्थी अपयशी ठरली. इस्रायलने तेहरानजवळील इराणी रडार साइटवर हवाई हल्ला केला. यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. अॅक्सिओसच्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, आम्ही हल्ला थांबवू शकत नाही. इराणच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काहीतरी करणे आवश्यक आहे. इराणने युद्धबंदीचे उल्लंघन करुन दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे
मीडियाशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, तसे पाहता आता इराणकडे अण्वस्त्रे असणार नाहीत. त्यांच्याकडे युरेनियम असणार नाही. त्यांच्याकडे अण्वस्त्रेही असणार नाहीत. ते एक उत्तम व्यापारी राष्ट्र होणार आहेत. त्यांच्याकडे भरपूर तेल आहे. ते चांगले काम करणार आहेत. मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे. राजवट बदलण्यासाठी अराजकता लागते. परंतु, आता कोणतीही अराजकता नको. पुढे काय होते, ते पाहू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इराण आणि इस्रायच्या भूमिकांवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. इराणवर मी खूश नाही, पण इस्रायलवर खूप नाराज असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने इशारा दिला आहे की, याचा प्रतिसाद जलद आणि 'दुप्पट विनाशकारी' असेल. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने स्पष्ट केले आहे की 'हा फक्त इशारा नाही तर सुरुवात आहे.'