वॉशिंग्टन: भारत आमचा मित्र आहे, असा उल्लेख करत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरच २५ टक्के टॅरिफचा बॉम्ब टाकला. १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावले जाईल. दोन्ही देशांतील व्यापार कराराच्या वाटाघाटी काही मुद्यांवर अडल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. रशियाकडून लष्करी साहित्य व तेलाची खरेदी तसेच द्विपक्षीय व्यापारातील अवमानकारक अडथळे यामुळे भारताला दंडही लावला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, भारताने व्यापारात काही अवमानकारक बिगर-आर्थिक (नॉन-मनिटरी) अडथळेही निर्माण करून ठेवले आहेत. भारत रशियाकडून नेहमीच मोठ्या प्रमाणात लष्करी साहित्याची खरेदी करीत आला आहे. रशियाने युक्रेनमधील हत्या थांबवाव्यात, असे प्रत्येकाला वाटत असताना भारत हा चीनसोबत रशियाचा सर्वांत मोठा लष्करी साहित्य खरेदीदार बनलेला आहे. हे काही योग्य नाही. त्यामुळे भारताला २५ टक्के टॅरिफ व दंड आकारला जाईल.
काय असते टॅरिफ... समजून घ्या सोप्या शब्दांमध्ये...
जेव्हा एखादा देश (अमेरिका) दुसऱ्या देशाकडून (भारत) वस्तू आयात करतो, तेव्हा त्या वस्तूंवर सरकारकडून आकारले जाणारे कर किंवा शुल्क म्हणजे टॅरिफ होय. जर भारतातून अमेरिका १०० रुपयांची वस्तू आयात करत असेल आणि टॅरिफ दर २५% असेल, तर अमेरिकन आयातदाराला ती वस्तू १२५ रुपयांना पडेल.
भारत सरकार म्हणते, आवश्यक पावले उचलणार
अमेरिका राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याची भारत सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्याचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांचे हित जपणे आणि त्यांना चालना देणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल आणि याआधी युकेसोबतच्या करारासारखेच प्रयत्न केले जातील, असे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
कोणत्या भारतीय उद्योगांवर आले आहे मोठे संकट
वस्त्रोद्योग आणि अपेरल्स : भारताचा वस्त्रोद्योग प्रामुख्याने अमेरिकेवर अवलंबून आहे. २०२३-२४ मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे ९.६ अब्ज डॉलर्सची वस्त्रे व अपेरल्सची निर्यात केली. या क्षेत्रातील एकूण निर्यातीपैकी २८% निर्यात अमेरिकेला झाली आहे .नव्या टॅरिफमुळे भारतीय उत्पादने महाग होणार असून अमेरिकन बाजारात स्पर्धात्मकतेत घट होईल. विशेषतः भारतीय गालिचे उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे, कारण भारतातील ५८% गालिचा निर्यात एकट्या अमेरिकेलाच होते.
फार्मास्युटिकल्स : अमेरिका हे भारतासाठी सर्वात मोठे जेनेरिक औषधांचे बाजार आहे. २०२४ मध्ये भारताची औषध निर्यात १२७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. नव्या टॅरिफमुळे भारतीय जेनेरिक औषधांचे दर वाढतील व विक्री होईल. याचा भारतीय फार्मा उद्योगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
शेती आणि सीफूड : ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार, मत्स्य, मांस आणि प्रक्रिया केलेल्या सीफूड निर्यातीवर सर्वाधिक परिणाम होईल. २०२४ मध्ये भारताची या क्षेत्रातील निर्यात सुमारे २.५८ अब्ज डॉलर्स होती, ज्यावर २७.८३% पर्यंतचा अतिरिक्त टॅरिफ लागू होण्याची शक्यता आहे.
पादत्राणे उद्योग : भारतीय पादत्राणे उद्योग दरवर्षी अमेरिकेला ४५.७६ कोटी डॉलर्सची निर्यात करतो. यावर १५% आयात शुल्क लागायचे, परंतु ते २५% होणार आहे. यामुळे भारतीय फुटवेअर महाग होऊन, ग्राहक दुसऱ्या देशांची उत्पादने पसंत करतील. परिणामी भारताची निर्यात घटेल.
स्मार्टफोन, आयफोन निर्मिती : भारतात स्मार्टफोन, आयफोन निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातील बहुतेक आयफोन हे अमेरिकेत निर्यात होतात. त्यावर २५% टॅरिफ लागल्याने आयफाेन निर्मिती उद्योगाला फटका बसेल. अमेरिकत भारतातील आयफोन महाग होतील.
भारत अमेरिकेला सर्वाधिक काय विकतो?
उत्पादन निर्यात मूल्य पेट्रोलियम उत्पादने ४.३१ औषधे व फार्मा उत्पादने १.४९ दूरसंचार उपकरणे १.४६ मोती व मौल्यवान रत्ने ०.९९ इलेक्ट्रॉनिक उपकरणे ०.९२(निर्यात मूल्य लाख कोटी रुपयांत)
भारत हा आमचा एक मित्र आहे. तथापि, कित्येक वर्षे आम्ही त्यांच्याशी फारच थोडा व्यवसाय करू शकलो आहोत. कारण त्यांचे टॅरिफ फारच जास्त आहेत. जगातील सर्वाधिक टॅरिफ असणाऱ्या देशांत भारताचा समावेश होतो. - डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका.