"क्या करें, साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है" अभिनेता नाना पाटेकर यांचा हा डायलॉग प्रचंड फेमस झाला होता. सध्या फिलीपींसमध्ये याच मच्छरांना मारण्याची अजब मोहीम हाती घेण्यात आली आहे. फिलीपींसची राजधानी मनीला इथं एका गावात मच्छर देऊन पैसे घेण्यासाठी रांग लागली आहे. प्रत्येक ५ मच्छरमागे मग ते जिवंत असो वा मृत त्यावर १ फिलीपीन पेसो म्हणजे १.५ रुपये दिले जात आहेत. मच्छरांच्या बदल्यात पैसे देण्याची ही अनोखी मोहीम देशात वाढणाऱ्या डेंगू रुग्णांच्या संख्येमुळे लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी घेतली जात आहे.
मनीलामधील एडिशन हिल्स गावातील कॅप्टन कार्लिटो सेर्नल यांनी म्हटलं की, मच्छरांच्या बदल्यात पैसे देण्याची मोहीम आम्ही घेतली आहे ज्याचा हेतू डेंगूविरोधात गावातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे. त्यातून लोक आसपास स्वच्छता ठेवण्यासाठी प्रेरित होतात आणि डेंगू उत्पादक डासांची पैदास होण्यापासून रोखली जाते असं त्यांनी सांगितले. या मोहिमेमुळे स्थानिक लोकांमध्ये बराच उत्साह आहे. ते डबे, कप अथवा एखाद्या भांड्यात भरभरून मच्छर आणत आहेत असं फिलीपींसमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक रहिवासी इलुमिनाडो कँडासुआ एका सीलबंद प्लास्टिक कपमध्ये ३ जिवंत मच्छर घेऊन आले ज्याची मोजणी केल्यानंतर त्यांना अल्ट्रा वॉयलेट लाइट मशीनद्वारे मारण्यात आले. मच्छरांना पकडणे फार कठीण काम असते. मला जो काही पैसा मिळतो, भलेही तो कमी असेल तरी मी तो एका डब्यात साठवतो. हा डबा जेव्हा पैशाने भरेल तेव्हा मी माझ्या मुलाला फोन खरेदी करून देईन असं त्याने सांगितले. संयुक्त राष्ट्राची जागतिक आरोग्य संघटनेने फिलीपींसला सर्वाधिक डेंगूने प्रभावित असलेला देश म्हटलं आहे. २०२३ साली फिलीपींसमध्ये डेंगूचे १,६७,३५५ रुग्ण आढळले होते.
यावर्षीही वेगाने पसरतोय डेंगू
फिलीपींसच्या आरोग्य मंत्रालयाकडून जारी झालेल्या आकडेवारीत यंदाच्या १ फेब्रुवारीपर्यंत देशात २८ हजार २३४ डेंगूचे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा मागील वर्षीच्या याच काळातील तुलनेत ४० टक्के अधिक आहे. क्वेजोन शहरात डेंगूचे १७६९ रूग्ण आढळले. त्यातील १० लोकांचा मृत्यू झाला होता. एडिशन हिल्स गावातही डेंगू अधिक वेगाने पसरतो.
अनोख्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह
फिलीपींसमधील या मोहिमेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत जर लोकांनी पैशाच्या लालसेपोटी मच्छर पाळायला सुरूवात केली तर मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो असं म्हटलं आहे. तर जसं डेंगूच्या रुग्णात घट दिसून येईल तेव्हा मच्छरांच्या बदल्यात पैसे देण्याची मोहीम थांबवली जाईल असं कॅप्टन सेर्नल यांनी म्हटलं आहे.