पहलगामच्या बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ (TRF) या पाक-समर्थित संघटनेला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं की, TRF ही पाकिस्तान-समर्थित आणि संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वीच दहशतवादी घोषित केलेल्या लष्कर-ए-तैयबाचीच एक ‘प्रॉक्सी’ संघटना आहे.
TRF म्हणजे लष्कर-ए-तैयबाचाच छद्म अवतार!
TRF हे लष्कर-ए-तैयबाचं एक छद्म रूप मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या संघटनेने काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. २०१८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला हा सर्वात भीषण हल्ला होता. TRF ने २०२४ मध्ये झालेल्या हल्ल्यांसह भारतीय सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेच्या या घोषणेमुळे TRF च्या आर्थिक आणि प्रवासाच्या संसाधनांवर कठोर निर्बंध येतील, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर दहशतवादाला प्रोत्साहन देणारी संघटना म्हणून ओळख मिळेल.
स्थापना आणि उद्देश काय?
ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर लगेचच ऑक्टोबर २०१९ मध्ये TRFची स्थापना झाली. सुरुवातीला त्यांनी स्वतःला स्थानिक काश्मिरी प्रतिकार आंदोलन म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही संघटना लष्कर-ए-तैयबासाठीच काम करते आणि ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (FATF) चौकशीतून वाचण्यासाठी तिला नवी ओळख दिली गेली, असं मानलं जातं.
जानेवारी २०२३ मध्ये भारत सरकारने TRFवर बंदी घातली आणि त्याचे प्रमुख नेते शेख सज्जाद गुल यांना दहशतवादी घोषित केलं. नागरिक, धार्मिक अल्पसंख्याक आणि सुरक्षा दलांवर हल्ले करणे, शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करणे, सीमेपलीकडील दहशतवाद्यांची घुसखोरी करणे आणि भरती मोहिम चालवणे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणे हे TRFचे मुख्य उद्देश आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत होईल आणि दहशतवादाविरोधातील लढाईत बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.