Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामावरून काँग्रेस केंद्र सरकारला प्रश्न विचारत असतानाच, दुसरीकडे मात्र भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा जगभरात डंका वाजताना दिसत आहे. जगभरातील अनेक देश भारताच्या या कारवाईचे कौतुक करत असून, दहशतवादी कारवायांबाबत पाकिस्तानकडे बोट दाखवत आहे. पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटमधीलच्या मायकल रुबिन यांनी भारत राजनैतिक आणि लष्करी या दोन्ही पातळ्यांवर जिंकला असल्याचे म्हटले आहे.
मायकल रुबिन म्हणतात की, लष्करी आणि राजनैतिक या दोन्ही आघाड्यांवर भारताचा हा मोठा विजय आहे. भारत राजनैतिकदृष्ट्या जिंकण्याचे कारण म्हणजे आता सर्व जगाचे लक्ष पाकिस्तान प्रायोजक दहशतवादावर आहे. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात लष्करी गणवेशातील पाकिस्तानी अधिकारी उपस्थित होते. यावरून असे दिसून येते की, दहशतवादी आणि आयएसआय किंवा पाकिस्तानी सशस्त्र दलाचा सदस्य यांच्यात कोणताही फरक नाही. आता जगभरातून पाकिस्तानला त्यांच्या स्वतःच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची मागणी जोर धरू लागेल. भारताने राजनैतिकदृष्ट्या संवादाचा सूर बदलला आहे. लष्करीदृष्ट्या सांगायचे झाल्यास हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. भारताविरोधात प्रत्येक युद्ध पाकिस्तानने सुरू केले आणि तो कसा जिंकला, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, ४ दिवसांचे युद्ध कसे जिंकले, हे स्वतःला पटवून देणे पाकिस्तानचा चांगलेच कठीण जाणार आहे, असे रुबिन यांनी म्हटले आहे.
प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.
रुबिन यांनी पुढे बोलताना सांगितले की, भारताला हा संघर्ष कधीच अपेक्षित नव्हता. हा संघर्ष भारतावर लादण्यात आला आहे. प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. पण भारताची जबाबदारी आहे की त्यांनी ठामपणे सांगितले की, नाही. आम्ही आमच्या सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले कधीही सहन करणार नाही. म्हणूनच भारताने जे केले, ते अत्यंत आवश्यक होते, असे रुबिन यांनी नमूद केले.
दरम्यान, पाकिस्तान एखाद्या श्वानाप्रमाणे दोन पायांत शेपूट घालून युद्धविराम करण्यासाठी पळत सुटला. पाकिस्तानी सैन्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हे केले. पाकिस्तानी लष्कर केवळ हरलेच नाही तर ते खूप वाईट रीतीने हरले, या वस्तुस्थितीपासून पळ काढता येणार नाही. पाकिस्तानी लष्करात खूप समस्या आहेत आणि ते दुबळे आहे, हे स्पष्ट आहे. असीम मुनीर आता पदावर कायम राहतील का, असा प्रश्न उपस्थित करताना रुबिन म्हणाले की, मूळात पाकिस्तानला स्वतःचे घर स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि असे करण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत का, हा खरा आणि खुला प्रश्न आहे, असे रुबिन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.