जम्मूमध्ये ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे भारतीय दूतावासावर ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं आहे. भारतानं या घटनेला अतिशय गांभीर्यानं घेतलं असून पाकिस्तान सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाडून याबाबतचं निवेदन देखील जारी केलं जाणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ड्रोन घिरट्या घालत असतानाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सध्या सुरू आहे. (After Jammu Drone attack Drone spotted inside Indian High Commission in Islamabad Pakistan)
गेल्या आठवड्यात जम्मूच्या हवाईतळावर ड्रोनच्या सहाय्यानं स्फोट घडवून आणण्यात आला होता. यात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी हवाईल तळावरील छताचं नुकसान झालं होतं. दहशतवादी आता हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचं यातून निष्पन्न झालं आहे. हवाई तळावरील हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी लष्करी तळावर ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं होतं. यावेळी भारतीय जवानांनी ड्रोनच्या दिशेनं गोळीबार देखील केला होता. जम्मूच्या कालचूक स्टेशनवर पहाटे तीन वाजता ड्रोन घिरट्या घालत असल्याचं आढळून आलं होतं.
गेल्या रविवारी जम्मूच्या हवाई तळावर रात्री उशिरा ड्रोनच्या माध्यमातून दोन स्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणले होते. रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी पहिला स्फोट झाला होता. त्यानंतर पाच मिनिटांनी दुसरा स्फोट झाला होता. यात दोन जवान किरकोळ जखमी झाले होते. तर हवाईतळाच्या छताचं नुकसान झालं होतं.
ड्रोन हल्ल्याचा मुद्दा भारतानं संयुक्त राष्ट्रांसमोर देखील उपस्थित केला. दहशतवाद्यांकडून तंत्रज्ञानाचा केला जात असलेला दुरूपयोग अतिशय चिंतेची बाब आहे. जर या संदर्भात कोणतीच ठोस पावलं उचलंली गेली नाहीत तर दहशतवादाविरोधातील लढाईत जिंकणं अतिशय कठीण होऊन बसेल, असं भारतानं स्पष्ट शब्दांत म्हटलं होतं.