पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज होणाऱ्या ऐतिहासिक अमेरिका-इराण शांतता चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठे संकट उभे ठाकले आहे. इराणच्या शिष्टमंडळाने अत्यंत कडक भूमिका घेत अमेरिकेसमोर दोन अटी ठेवल्या आहेत. "या अटी मान्य झाल्याशिवाय पुढे कोणतीही चर्चा होणार नाही," असे इराणने स्पष्ट केल्यामुळे या हाय-व्होल्टेज बैठकीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इराणच्या त्या २ अटी कोणत्या?
इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चर्चेसाठी पुढील अटी घातल्या आहेत.
लेबनॉन-इस्रायल पूर्ण युद्धविराम: लेबनॉनवरील इस्रायली हल्ले त्वरित थांबवून तिथे पूर्णतः सीझफायर लागू करावा.
फ्रीज केलेली मालमत्ता मुक्त करा: अमेरिकेने रोखून धरलेली इराणची सर्व मालमत्ता तातडीने रिलिज करावी.
'अमेरिकेवर आमचा विश्वास नाही'
इस्लामाबादमध्ये पोहोचल्यानंतर गालिबाफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. "आम्ही चांगल्या हेतूने येथे आलो आहोत, पण आम्हाला अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. गेल्या अनेक चर्चांमध्ये इराणने समंजसपणा दाखवला, तरीही आमच्यावर हल्ले झाले आणि युद्धाची परिस्थिती निर्माण केली गेली," असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
जेडी वेंस आणि जेरेड कुशनर मैदानात
दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्या नेतृत्वाखालील शक्तिशाली शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे हे प्रतिनिधी इराणच्या या अटींना कसा प्रतिसाद देतात, यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
इस्लामाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त
दोन्ही देशांच्या नेत्यांच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तान सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काल रात्रीपासूनच दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून रेड झोनमध्ये सुरक्षा यंत्रणांचा मोठा वेढा आहे. जर ही चर्चा फिस्कटली, तर पश्चिम आशियातील तणाव अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Ahead of US-Iran talks in Islamabad, Iran demands ceasefire in Lebanon and release of frozen assets. Iran distrusts America, warning of retaliation if deceived. US delegation led by JD Vance is present, raising concerns about escalating West Asia tensions.
Web Summary : इस्लामाबाद में अमेरिका-ईरान वार्ता से पहले, ईरान ने लेबनान में युद्धविराम और जमी संपत्तियों को जारी करने की मांग की। ईरान को अमेरिका पर भरोसा नहीं है, धोखा देने पर जवाबी कार्रवाई की चेतावनी। जेडी वेंस के नेतृत्व में अमेरिकी प्रतिनिधिमंडल मौजूद है, जिससे पश्चिम एशिया में तनाव बढ़ने की आशंका है।