लंडनच्या बोनहॅम्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका ऑनलाइन लिलावात महात्मा गांधींच्या एका अत्यंत दुर्मिळ चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंगळवारी झालेल्या या लिलावात, या सुंदर तैलचित्राला तब्बल १,५२,८०० पाउंड्स म्हणजेच जवळपास १.७ कोटी रुपये इतकी किंमत मिळाली. विशेष म्हणजे, ही रक्कम चित्राच्या अंदाजित किमतीच्या तिप्पट होती.
अपेक्षेपेक्षा तिप्पट भाव!ब्रिटिश कलाकार क्लेअर लाइटॉन यांनी काढलेल्या या चित्राला 'पोर्ट्रेट ऑफ महात्मा गांधी' असे नाव दिले होते. लाइटॉन कुटुंबियांना या चित्रासाठी ५७-८० लाख रुपयांच्या आसपास किंमत मिळेल, अशी अपेक्षा होती, पण या चित्राने १.७ कोटींचा टप्पा गाठून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
काय आहे या फोटोत खास?या चित्राबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे, असे मानले जाते की हे एकमेव चित्र आहे ज्यासाठी महात्मा गांधी स्वतः पोर्ट्रेट मोडमध्ये बसले होते आणि चित्रकाराने त्यांच्या समोर बसून हे अप्रतिम तैलचित्र साकारले होते. यामुळेच या चित्राचे ऐतिहासिक महत्त्व अनमोल आहे.
१९७४ मध्ये हल्ल्यातून बचावले!लाइटॉन कुटुंबीयांच्या माहितीनुसार, हे चित्र १९७४ मध्ये एका सार्वजनिक प्रदर्शनात ठेवले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्यांने या चित्रावर हल्ला केला होता. त्यानंतर या चित्राची दुरुस्ती करण्यात आली. या घटनेमुळेच लाइटॉन कुटुंबीयांना हे चित्र इतक्या मोठ्या किमतीत विकेल, अशी अपेक्षा नव्हती.
९४ वर्षांनी विक्री, काय आहे या चित्रामागील कहाणी?हे चित्र १९३१ सालचे आहे, जेव्हा महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले होते. या चित्राच्या निर्मितीमागे एक मनोरंजक कथा आहे. चित्रकार क्लेअर लाइटॉन त्यावेळी प्रसिद्ध राजकीय पत्रकार हेन्री नोएल यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. हेन्री हे भारताच्या स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक होते. याच ओळखीमुळे हेन्री यांची महात्मा गांधींशी भेट झाली आणि त्याच निमित्ताने क्लेअर लाइटॉन यांनाही गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली.
या भेटीदरम्यान, लाइटॉन यांनी गांधीजींचे चित्र काढण्याची विनंती केली आणि गांधीजींनी ती मान्य केली. गांधीजी पोर्ट्रेट मोडमध्ये बसले आणि क्लेअर यांनी त्यांना कॅनव्हासवर उतरवले. हे तैलचित्र गांधीजींनाही खूप आवडले होते. तब्बल ९४ वर्षांनंतर आता हे दुर्मिळ चित्र लिलावात विकले गेले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा गांधीजींच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे.