तुम्ही कधी विचार केला आहे का एखादा २० वर्षीय मुलगा जंगलाच्या मधोमध स्वत:चा एक देश बनवू शकतो? तेदेखील झेंडा, संविधान, पासपोर्ट आणि ४०० लोकांसोबत...ही एखाद्या सिनेमाची कहाणी नाही तर प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. ब्रिटनच्या डॅनियल जॅक्सनने यूरोपातील वादग्रस्त भूभागावर फ्री रिपब्लिक ऑफ वेर्डिस(Free Republic of Verdis) नावाचा छोटा देश बनवला आहे. त्याने स्वत:ला या देशाचा राष्ट्रपती घोषित केले. ४०० हून अधिक लोकांना त्याच्या देशाचे नागरिकत्व दिले. त्यांना पासपोर्टही जारी केले आहे.
सीमावादातून मिळालं स्वातंत्र्य
हा अनोखा देश युरोपाचे दोन देश क्रोएशिया आणि सर्बिया यांच्यातील वादग्रस्त जमिनीवर वसवला आहे. या जागेला पॉकेट थ्री असं ओळखले जाते. ज्याठिकाणी दोन्ही देशांनी आतापर्यंत कुठलाही अधिकृत दावा केला नाही. या रिकाम्या असलेल्या १२५ एकर जमिनीवर डॅनियलने त्याचा देश उभारला असून स्वत:ला राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे.
१४ व्या वर्षी डोक्यात आली आयडिया
डॅनियलने सांगितले की, वेर्डिस देश बनवण्याचं स्वप्न मी वयाच्या १४ व्या वर्षी पाहिले होते. सुरुवातीला दोन मित्रांच्या मदतीने गमंत म्हणून हा प्रयोग केला. परंतु २०१९ मध्ये ३० मे रोजी औपचारिकरित्या वेर्डिसच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. आता या छोट्या देशाचा स्वत:चा झेंडा, सरकार, मुद्रा आणि ४०० जणांची लोकसंख्या आहे. वेर्डिसने त्यांच्या देशातील नागरिकांना पासपोर्टही जारी केला आहे. त्याचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी करता येणार नाही असं डॅनियलने स्पष्ट केले. परंतु काही लोक सीमेपलीकडेही त्याचा वापर करत आहेत.
वेर्डिस देशाचा बहुतांश भाग जंगलाने वेढलेला आहे. या देशापर्यंत पोहचण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागतो. या देशापासून सर्वात जवळचे शहर क्रोएशिया आहे. जे नदीच्या पलीकडे आहे. जिथे इंग्रजी, क्रोएशियाई, सर्बियाई या अधिकृत भाषा असून युरो हे चलनात वापरले जाते. एकीकडे डॅनियल त्याच्या देशासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे तर ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याला मोठा झटका बसला. क्रोएशियाई पोलिसांनी त्याला ताब्यात घेत देशातून बाहेर काढले. भविष्यात तिथे प्रवेश करण्यावर बंदी आणली. देशातून काढल्यानंतरही डिजिटल माध्यमातून डॅनियल जॅक्सन वेर्डिस इथलं सरकार चालवतो. माझा उद्देश सत्तेचा नाही तर शांत आणि स्वतंत्र देश बनवण्याचा आहे असं जॅक्सनने म्हटलं आहे.
दरम्यान, ४ मित्रांनी सुरू केलेला हा प्रवास आता ४०० नागरिकांपर्यंत येऊन पोहचला आहे. या देशात हजारो लोक स्थलांतरित करण्याची इच्छा व्यक्त करतात. इथले नागरिकत्व मिळवण्यासाठी डॅनियल जॅक्सनने अनुभवी टीम आणि कौशल्य याला प्राधान्य दिले आहे. हे लोक आरोग्य, सुरक्षा आणि प्रशासनाशी निगडीत असायला हवेत. जॅक्सनचा हा प्रयोग अजबच नाही तर एक विचार, एक जिद्द आणि मेहनत एकत्र आली तर अशक्यही गोष्ट शक्य होऊ शकते हे जगाला दाखवून देते. वेर्डिस देशाला भलेही जागतिक पटलावर मान्यता नसेल परंतु या अनोख्या देशाने चर्चेला वाव दिला आहे.