वॉशिंग्टन : अमेरिकेत एफबीआयचे माजी संचालक जेम्स कॉमी यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. समुद्रकिनारी शिंपल्यांनी ‘८६४७’ हे आकडे दर्शवणारी आकृती कॉमी यांनी पोस्ट केली होती. ही संख्या म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचे आवाहन असल्याचा अर्थ लावण्यात आला आणि अमेरिकी सिक्रिट सर्व्हिसने तातडीने याची चौकशी सुरू केली आहे. नंतर ही पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आली आहे.
कॉमी यांनी या पोस्टसोबत लिहिले होते की, ‘ही आहे समुद्रकिनारी फिरताना केलेली शिंपल्यांची रचना.’ ही पोस्ट व्हायरल होताच ट्रम्प प्रशासनातील अधिकारी गडबडले. ट्रम्प यांचा मोठा मुलगाही भांबावला. त्याने ही पोस्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या जीवनाला धोका सांगणारी असल्याचे मानले.
काय आहे ८६४७ चा अर्थ?
८६ हा आकडा एखादी वस्तू काढून टाकणे, बाजूला करणे, फेकून देणे यासाठी वापरला जातो, तर ४७ या संख्येचा संबंध थेट ट्रम्प यांच्याशी जोडण्यात आला आहे. कारण ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या हत्येचे हे आवाहन तर नाही ना, अशी शंका उपस्थित झाली.
कॉमींना तुरुंगात टाका
राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी कॉमी यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे म्हटले आहे.