रशियाच्या पूर्वेकडील कमचटका बेटाच्या किनाऱ्याजवळ आज सकाळी भूकंपाचा तीव्र झटका जाणवला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिक्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. त्याचा केंद्रबिंदु कमचटका शहरापासून सुमारे १११ किलोमीटर पूर्वेकडे उत्तर प्रशांत महासागरात आहे. पहाटे २.३७ मिनिटांनी झालेल्या या भूकंपामुळे रशियातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
जुलैमध्ये ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप ज्या भागात आला होता आणि ज्यामुळे पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, त्याच भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज झालेल्या भूकंपामुळे कोणत्याही संभाव्य त्सुनामीच्या धोक्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जुलैमध्ये रशियाच्या कमचटका प्रदेशात ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे पूर्व रशियामध्ये जोरदार हादरा बसला होता. जपान, अमेरिका आणि अनेक पॅसिफिक बेट देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार हा भूकंप गेल्या १४ वर्षांतील जगातील सर्वात शक्तिशाली आणि आतापर्यंतचा सहावा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंप होता, ज्यामुळे विनाशकारी त्सुनामी आली होती. कमचटका बेटाजवळ मोठ्या भूकंपांचा इतिहास आहे. १९५२ मध्ये सोव्हिएत काळात या प्रदेशात ९.० रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला होता, जो इतिहासातील सर्वात मोठा भूकंप होता. जुलैमध्ये झालेल्या भूकंपानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी हवाई, अलास्का, कॅलिफोर्निया आणि पश्चिम किनाऱ्यावरील इतर राज्यांना त्सुनामीचा इशारा दिला.
सध्याच्या भूकंपामुळे पॅसिफिक महासागराच्या विविध भागातील अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संवेदनशील भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. अलीकडेच अफगाणिस्तानात मोठा भूकंप झाला. या भूकंपात शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाले. येथील भूकंपाची तीव्रता ६.० होती तरीही इतका मोठा विध्वंस झाला. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, भूकंपाचे केंद्र जलालाबाद शहरापासून पूर्वेला २७ किलोमीटर अंतरावर होते.