Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले आहेत. ऑपरेशन सिंदूर या नावाने ही मोहिम राबवण्यात आली. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. भारताने अद्याप या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, या हल्ल्यानंतर पाकिस्तानात झालेल्या कारवाईचे व्हिडीओ समोर आले आहेत. स्थानिकांनीही या हल्ल्याबाबत माहिती देताना ड्रोन हल्ला झाल्याचे म्हटलं.
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. ही कारवाई भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे केली. या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानातील लोकांनी तिथे घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती दिली.
भारताने ऑपरेशन सिंदूर चालवत असताना पाकिस्तानच्या पंजाबमधील मुरीदके येथे ड्रोन हल्ला केला. एका स्थानिकाने सांगितले की, ड्रोन हल्ल्यात एका मशिदीचा प्रशासकीय परिसर आणि त्याच्या छताला उद्ध्वस्त करण्यात आले. "रात्री १२.४५ च्या सुमारास आम्ही झोपलो होतो. आधी एक ड्रोन आला तो थोडा उंचीवर होता. त्यानंतर आणखी तीन ड्रोन आले. सर्व ड्रोनने मशिदीवर हल्ला केला. ड्रोन हल्ल्यात प्रशासकीय कार्यालय आणि मशिदीचे छत उद्ध्वस्त झाले. एक अधिकारी छतावर बसला होता, तो मारला गेला," असं स्थानिकाने सांगितले.
दुसरीकडे, मुझफ्फराबाद येथील स्थानिक रहिवासी अहमद अब्बासी यांनी सांगितले की, अचानक गोळीबार सुरू झाला आणि सुमारे १० ते १५ क्षेपणास्त्रे येऊन पडली. हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या मशिदींमध्ये एक मदरसा देखील होता.