अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करून मोठ्या ट्रकिंग कंपन्यांमध्ये चालक म्हणून काम करणाऱ्या घुसखोरांविरोधात अमेरिकन सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाने मोठी मोहीम उघडली आहे. कॅलिफोर्नियामध्ये राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ३० भारतीय नागरिकांसह एकूण ४९ अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण व्यावसायिक ड्रायव्हर लायसन्सचा वापर करून सेमी-ट्रक चालवत होते, ज्यामुळे अमेरिकेतील महामार्गांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
अशी झाली मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत इंडियो स्टेशनच्या एजंटनी हायवे ८६ आणि १११ वर तपासणी नाके लावले होते. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या सेमी-ट्रकची तपासणी केली असता, तब्बल ४२ अवैध प्रवासी ट्रक चालवताना आढळले. यामध्ये ३० भारतीय होते, तर उर्वरित चीन, रशिया, मेक्सिको, तुर्की आणि युक्रेनसारख्या देशांतील नागरिक होते. याशिवाय 'ऑपरेशन हायवे सेंटिनल' अंतर्गत राबवलेल्या दोन दिवसीय मोहिमेत ७ जणांना अटक करण्यात आली, ज्यात ५ भारतीयांचा समावेश आहे.
प्राणघातक अपघातांनंतर प्रशासन सतर्क
गेल्या काही दिवसांत अमेरिकेत अनेक भीषण रस्ते अपघात झाले होते. या अपघातांच्या तपासात असे समोर आले की, अनेक ट्रक हे अशा व्यक्ती चालवत होते ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्याचे वैध कागदपत्रे नाहीत, तरीही त्यांच्याकडे व्यावसायिक ड्रायव्हर लायसन्स आहे. यामुळेच कॅलिफोर्नियातील ट्रकिंग कंपन्यांना लक्ष्य करून ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट रस्ते सुरक्षा सुनिश्चित करणे आणि इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन रोखणे हे होते.
लायसन्सचा धक्कादायक उलगडा
अटक करण्यात आलेल्या या व्यक्तींकडून एकूण ३९ कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ३१ लायसन्स एकट्या कॅलिफोर्निया राज्याने जारी केले होते. उर्वरित लायसन्स न्यूयॉर्क, न्यू जर्सी, फ्लोरिडा, वॉशिंग्टन आणि इलिनॉय यांसारख्या विविध राज्यांतून मिळवण्यात आले होते. अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या व्यक्तींना हे परवाने कसे मिळाले, हा आता मोठा वादाचा विषय ठरला आहे.
राज्यांवर ओढले ताशेरे
एल सेंट्रो सेक्टरचे कार्यवाहक मुख्य पेट्रोल एजंट जोसेफ रेमेनार यांनी या कारवाईनंतर राज्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. "ज्या राज्यांनी या घुसखोरांना लायसन्स दिले, ते अलीकडच्या प्राणघातक अपघातांना थेट जबाबदार आहेत. या व्यक्तींनी कधीही हे मोठे ट्रक चालवायला नको होते," असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. सध्या या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर इमिग्रेशन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
Web Summary : US authorities arrested 30 Indian nationals among 49 illegal immigrants in California for driving semi-trucks using commercial licenses without proper documentation. This crackdown followed fatal accidents involving unlicensed drivers, raising concerns about highway safety and immigration law violations. Investigations are underway regarding how these individuals obtained licenses.
Web Summary : कैलिफ़ोर्निया में 49 अवैध प्रवासियों में 30 भारतीय गिरफ्तार, बिना दस्तावेज़ों के वाणिज्यिक लाइसेंस का उपयोग कर सेमी-ट्रक चला रहे थे। घातक दुर्घटनाओं के बाद कार्रवाई, जिसमें बिना लाइसेंस वाले ड्राइवर शामिल थे, राजमार्ग सुरक्षा और आप्रवासन कानून के उल्लंघन पर चिंता जताई गई। लाइसेंस कैसे मिले, इसकी जांच जारी है।