कॉक्स बाजार : म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे केवळ एका आठवड्यात सुमारे १८,००० रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात पलायन केले आहे. मागील आॅक्टोबरपासून सुमारे ८७,००० रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतलेला आहे.स्थलांतरितांच्या आंतरराष्टÑीय संघटनेच्या प्रवक्त्या संजुक्ता सहानी सांगितले की, म्यानमारचे सैनिक रोहिंग्या अतिरेक्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना गावेच्या गावे जाळून भस्मसात करीत आहेत व नागरिकांवर बेछूट गोळीबार करीत आहेत. दुसरीकडे म्यानमार सरकारने हिंसाचार, अराजकासाठी रोहिंग्यांना जबाबदार धरले आहे. मागील रविवारी हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे; मात्र वास्तवातील संख्या यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.म्यानमारमध्ये सुमारे १० लाख रोहिंग्या राहत असून, त्यापैकी बहुतांश संख्या राखीने प्रांतात आहे. मागील आठवड्यात रोहिंग्यांनी पोलीस चौक्यांवर हल्ले केले असून, सरकारी फौजांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. रोहिंग्यांची समस्या केवळ म्यानमार आणि बांगलादेश दरम्यानची नसून, हा आंतरराष्टÑीय चर्चेचा विषय आहे.कॉक्स बाजार जिल्ह्याचे वरिष्ठ सरकारी अधिकारी अली हसन यांनी सांगितले की, येथे फार भयानक स्थिती आहे. आम्ही याबाबत सरकारला कळवले आहे.
हिंसाचारामुळे १८,००० रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमधून बांगलादेशात, गावे जाळून भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 02:51 IST