भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी अनेक युवक युवती जीवापाड मेहनत करत असतात. यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वारंवार प्रयत्न करतात, त्यात काहींना यश येते तर काहींच्या पदरी निराशा येते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. यातीलच एक नाव आहे अर्तिका शुक्ला, या मुलीने आधी MBBS शिक्षण घेत डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर दोन भावांच्या मदतीने तिने विना कोचिंग आयएएस अधिकारी बनण्यात यश मिळवले.
वाराणसीत राहणारी अर्तिका शुक्ला हिची आई हाऊसमेकर आणि वडील बृजेश शुक्ला व्यवसायाने डॉक्टर आहेत. अर्तिकाला २ मोठे भाऊ आहेत, उत्कर्ष आणि गौरव शुक्ला असं त्यांचे नाव आहे. अर्तिकाच्या दोन भावांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. २०१२ साली मोठा भाऊ गौरवने यश मिळवले तर दुसरा भाऊ आयआरटीएस अधिकारी आहे. अर्तिकाने प्राथमिक शिक्षण वाराणसीतील सेंट जॉन्स स्कूलमध्ये पूर्ण केले, जिथे ती अभ्यासात नेहमीच अव्वल राहिली. शालेय जीवनात तिने विज्ञान आणि गणितात विशेष रुची दाखवली ज्यामुळे तिचा वैद्यकीय क्षेत्राकडे कल वाढला.
उच्च शिक्षणासाठी अर्तिकाने दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. तिने २०१२ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले आणि त्यानंतर दिल्लीतील लोक नायक हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर, तिने चंदीगढ येथील पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) मध्ये बालरोग (पीडियाट्रिक्स) मध्ये एमडी सुरू केली. मात्र तिच्या मनात प्रशासकीय सेवेची आवड निर्माण झाली आणि तिने एमडी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
२०१४ मध्ये तिने एमडी सोडली आणि केवळ ८ महिन्यांच्या कालावधीत यूपीएससीची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे तिने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. फक्त सेल्फ स्टडी आणि ऑनलाइन रिसर्चवर ती अवलंबून राहिली. २०१५ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तिने पहिल्याच प्रयत्नात चौथी रँक मिळवली. तिचा ऑप्शनल विषय मेडिकल सायन्स होता ज्यात तिला वैद्यकीय पार्श्वभूमीचा फायदा झाला. २०१६ बॅचची राजस्थान कॅडरची आयएएस अधिकारी असलेल्या अर्तिकाने विविध पदांवर काम केले आहे. तिच्या सेवाकाळात तिने आरोग्य, शिक्षण आणि प्रशासकीय सुधारणांवर भर दिला आहे. २०१७ साली तिने यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या जसमीत संधूसोबत लग्न केले. सध्या दोघेही राजस्थानात सेवा देत आहेत.