मोठमोठी स्वप्न पाहण्यासाठी झोपेची गरज असते तसं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि चिकाटीची गरज असते. बंगळुरूच्या सत्या शंकर यांची कहाणीही अशीच आहे. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी मिळवलेले यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. रिक्षा चालक ते जगातील सर्वात महागडी लग्झरी कार रॉल्स रॉयलचे मालक बनण्याचा त्यांचा प्रवासही हैराण करणारा आहे.
ही कहाणी सुरू होते ती १९८० च्या दशकापासून, जेव्हा सत्या शंकर बंगळुरूच्या रस्त्यावर रिक्षा चालवून त्यांचा उदरनिर्वाह करत होते. रिक्षा चालवत ते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होते. वेळ बदलली, रिक्षासाठी घेतलेले कर्ज फेडून ती रिक्षा विकली आणि अम्बेसिडर कार खरेदी केली. त्यानंतर ऑटो गॅरेज इंडस्ट्रीत त्यांनी एन्ट्री मारत वाहनांचे टायर विकण्याचं काम सुरू केले. परंतु नशिबात दुसरेच काही लिहून ठेवले होते. २००२ साली त्यांनी एसजी कॉर्पोरेट्स नावाची कंपनी बनवली आणि झीरा मसाला सोडासह अन्य प्रोडक्ट विक्री सुरू केली. नशिबाने साथ दिली अन् २३ वर्षाच्या संघर्षातून त्यांनी यशाचं शिखर गाठले.
कोट्यवधीचे मालक
आज सत्या शंकर यांच्याकडे सर्व काही आहे. त्याशिवाय रॉल्स रॉयल फॅटम कार आहे ज्याचं देश-विदेशातील बहुतांश लोक स्वप्नही पाहत नाहीत. सत्या शंकर यांच्या या कारची किंमत ११ कोटींहून अधिक आहे आणि विशेष म्हणजे ती सत्या शंकर यांच्यासाठीच बनवली गेली आहे. या लग्झरी सेडान कार भारतात २०१८ साली लॉन्च करण्यात आली होती. त्याची लांबी ५.७ मीटर आणि त्यात ३.७ मीटर व्हिलबेस दिला गेला आहे.
दरम्यान, भारतीय पेय पदार्थ विक्रीत सत्या शंकर यांनी स्वत:चा ब्रँड बनवत दिग्गज कंपन्यांना टक्कर दिली आहे. कर्नाटकच्या बेल्लारे गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आधी रिक्षा चालवली, त्यानंतर टॅक्सी चालवून पोट भरले परंतु १९८७ साली त्यांनी ऑटोमाबाईल इंडस्ट्रीज प्रवेश करत गॅरेज उद्योगात पाऊल ठेवले. २००० च्या दशकात सत्या शंकर यांच्या आयुष्यात नवं वळण आले. त्यांनी बाजारात झीरा सोडा विक्री करण्याचं ठरवले. बिंदू फिज झीरा मसाला सुरुवात करत त्यांनी बाजारात एन्ट्री घेतली. २००५-०६ या काळात त्यांनी ६ कोटींची उलाढाल केली. २०१० साली SG कॉर्पोरेट्सचं उत्पादन बिंदू फिज झीरा मसाला उत्पादनाने वेग पकडला. त्यानंतर त्यांनी १०० कोटींपर्यंत टप्पा गाठला. आज बिंदू झीराने UAE, सिंगापूर आणि मलेशियासारख्या देशात निर्यात करण्यास सुरुवात केली. २०२३ मध्ये मिडिया रिपोर्टनुसार त्यांच्या कंपनीचं मूल्य ८०० कोटीपर्यंत आहे.