एंटवर्प (बेल्जियम) : भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या युरोप दौ-याचा समोराप विजयाने केला. मात्र, या वेळी त्यांनी बेल्जियमच्या ज्युनियर पुरुष संघाला ४-३ असे पराभूत केले.भारताकडून गुरजित कौर व कर्णधार राणी यांनी प्रत्येकी दोन गोल केले. भारताने सामन्याच्या सातव्या मिनिटालाच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. गुरजितने हा गोल करीत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर ११ व्या मिनिटाला गुरजितनेच पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत २-० अशी आघाडी वाढविली.त्यानंतर कर्णधार राणीने १३ व्या मिनिटाला गोल करीत भारताला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. भारताची गोलरक्षक रजनी एटिमार्पूने आपले कौशल्य पणाला लावत अनेक गोल परतवून लावले. मध्यंतरापर्यंत भारताकडे ३-० अशी आघाडी होती.मध्यंतरानंतरही भारताचा गोल करण्याचा धडाका कायम होता. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला राणीने आणखी एक गोल करीत ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र बेल्जियमने आपला खेळ उंचावला. थिबाल्ट नेवेन याने ३८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर विल्यम डेसेलने गोल करीत आघाडी २-४ अशी कमी केली.सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला माथियास रेलिकने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत ३-४ अशा स्थितीत सामना आणला. शेवटच्या दहा मिनिटांत बेल्जियमने सामना बरोबरीत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना यश आले नाही. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला हॉकी संघ विजयी, बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष संघाला केले पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 03:59 IST