ढाका : आशिया चषक हॉकी स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध भारत आपली विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. जपानवर ५-१ अशा मोठ्या विजयानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला जपानवर विजय मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. सुरुवातीलाच जपानने गोल केला. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी जपानला कोणताही प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. भारताकडून सुनील, ललित उपाध्याय, रमनदीप सिंग व हरमनप्रित सिंग यांनी गोल केले. भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी बांगलादेशविरुद्ध आम्ही आणखी चांगला खेळ करु असे सांगितले. ते म्हणाले, ‘प्रशिक्षक म्हणून मी नेहमीच असंतुष्ट असतो. मला वाटते आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू शकलो असतो. स्पर्धेच्या सुरुवातीस असलेल्या दबावातून बाहेर पडून आम्ही पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहोत.’ बांगलादेशला पाकिस्तानने ७-० असे पराभूत केले आहे.मारिन म्हणाले, ‘जर आम्ही आमच्या रणनितीनुसार खेळलो तर आम्ही जरुर जिंकू शकतो.’ बांगलादेशचा कर्णधार रशिल महमूद याने, आम्ही मागच्या सामन्याचा विचार न करता जिंकण्यासाठीच मैदानात उतरु असे म्हटले आहे.तो म्हणाला,‘ पाकिस्तानविरुद्ध आम्ही चांगला खेळ केला नाही. आम्ही अनेक चुका केल्या. ही एक वाईट सुरुवात होती. आम्ही भारताविरुद्ध चांगला खेळ करु.’
आशिया चषक हॉकी: बांगलाविरुद्ध विजयासाठी भारत प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:06 IST