हिंगोली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेवून राजेशाहीतही आजच्या लोकशाहीला लाजवेल असे लोककल्याणकारी राज्य सोळाव्या शतकात उभे केले होते. आजच्या तरुणाईने समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही सामाजिक मूल्ये रुजविण्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेवून राजकारणात यावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव केले.
जिजाऊ व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत येथील राजे संभाजी महाविद्यालयात मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, उद्घाटक अॅड. केशव सिरसाट, प्रमुख उपस्थिती म्हणून माधव जाधव, संतोष बुद्रुक पाटील, खंडेराव सरनाईक, प्रा.सुधाकर इंगोले, जयप्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती. जाधव म्हणाले की, जगातील सर्व क्रांती तरुणाईने केल्या आहेत. पण, आजची तरुणाई मात्र राजकारणाला वाईट म्हणून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुणाईने राजकीय अंधश्रद्धेतून बाहेर पडून लोककल्याणासाठी राजकारणात आले पाहिजे. तथागत गौतम बुद्धांपासून संत गाडगेबाबांपर्यंत महापुरुषांच्या विचारांचा ठेवा आपल्या पाठीशी असताना शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांच्या पाठीमागे फिरू नये. सध्या पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा असा व्यवसाय सुरू आहे. याला तिलांजली द्यायची असेल तर राजकारण तत्त्वाचे असावे, तडजोडीचे नाही, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन महेश राखोंडे, जिजाऊवंदना अंजली कावरखे, प्रास्ताविक माधव जाधव, व्याख्यात्याचा परिचय विश्वजित घोडके शिवराज सरनाईक यांनी आभार मानले.