हिंगोली : घटत जाणारे जंगल क्षेत्र व त्यामुळे वन्य प्राण्यांचे शहरांकडे होणारे स्थलांतर हा चिंतेचा विषय बनला आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वनसंरक्षक व वन विकासासाठी भरीव योगदान दिल्यास मदत होणार आहे. या मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रूजवणूक व्हावी, यासाठी पाचवी पासून पुढील वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये वाईल्ड लाईफ क्लबची स्थापना करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.
या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव विषयी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यानिमित्त वन्य प्राण्यांची माहिती असणारे मासिके, नियतकालिके, चांगली पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देणे, वन्य जीवांची माहिती असणारे चित्रपट, महितीपट दाखविणे, ॲनिमल पार्क विषयी माहिती देणे, वन्य जीवाच्या सुरक्षेविषयी माहिती करून देणे, वन्य जीवांच्या जीवनचर्या विषयी माहिती देणे, पशुगणनेविषयी माहिती देणे, वन्य प्राण्यांविषयी घ्यावयाची काळजी घेणे, वन्यजीव सप्ताह साजरा करणे, चर्चा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, क्षेत्रभेटी, जैवविविधतेचे ज्ञान देणे, पर्यावरणीय बदल, प्रदूषण विषयी माहिती देणे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना देत शिक्षकांनीही कल्पकतेने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले. या उपक्रमाविषयी अहवालही सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे.