हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. एवढे असतानाही जिल्हा रुग्णालयात मात्र कोरोना तपासणी व अहवालासाठीही रांग लावावी लागत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा सूचना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या असताना त्याचे पालन होत नाही.
लसीकरण असो, तपासणी असो सोशल डिस्टन्सिंगची अत्यंत आवश्यकता आहे. परतु, जिल्हा रुग्णालयातील डीईआयसी विभागात मात्र हे होताना दिसून येत नाही. वयोवृद्ध वेटिंगसाठी बसलेले असतात, तर तरुण मंडळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याऐवजी विनामास्क रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत. खरे पाहिले तर अशावेळी येथे गार्डची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु, गार्डड कुठेही आढळून येत नाही. १४ मार्चच्या अहवालानुसार कोरोनाचे एकूण रुग्ण ४ हजार ७५६, बरे झालेले रुग्ण ४ हजार २७१, एकूण कोरोनाचे बळी ६५ असून, दररोज ३५० रुग्णांची तपासणी केली जाते, असे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. बाहेर पडावे तर वाढते ऊन आणि आत थांबावे तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. वयोवृद्ध मंडळी मास्क घालत आहेत. पण, तरुण मंडळी लसीकरणात विनामास्क फिरत आहेत.
प्रतिक्रिया
तपासणी, अहवाल तसेच लसीकरणासाठी होत असलेली गर्दी पाहून येथे कायमस्वरुपी गार्डची व्यवस्था करण्यात येईल. गर्दी करू नका, अशा सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत. परंतु, नागरिकांकडून पालन होताना काही दिसून येत नाही.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली
बॉक्स
गर्दीवर नियंत्रण ठेवायचे कसे ?
खरे पाहिले तर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गार्डडची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु, येथे गार्ड आहे की नाही, हा प्रश्न आहे. शहर व परिसरातील नागरिक लसीकरण, अहवालासाठी व तपासणीसाठी येतात. गार्ड दिसला नाही की, गर्दी करू लागतात. संबंधित डॉक्टर मंडळीही लक्ष देत नाहीत, असेच दिसते.
प्रतिक्रिया
लसीकरण, तपासणी आणि अहवाल लवकर मिळण्यासाठी डॉक्टरांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, कोणाचेही लक्ष नाही. एक - दोन जण सोडले तर बाकी नागरिक मास्कचा वापर कमी प्रमाणात करताना दिसून येत आहेत.
- दामाजी सावळे, हिंगोली
तपासणी, अहवाल व लसीकरणासाठी गर्दी होता कामा नये. पण, येथे गर्दी होताना दिसून येत आहे. कोरोनाची भीती लक्षात घेता येथे कायमस्वरुपी गार्डची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- मुरली कल्याणकर, हिंगोली
उन्हाचा पारा वाढला आहे. बाहेर उभे राहणे कठीण होत आहे. आरटीपीसीआर अहवाल व तपासणीसाठी उन्हात नागरिकांना अहवालाची वाट पाहात बसावे लागते. यासाठी सावलीची व्यवस्थाव करावी.
- उत्तम येरेकार, हिंगोली