आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : शहरातील पोलीस स्टेशनसमोरील एका हॉटेलसमोर ( एम. एच. 38 - एम 8016 ) या क्रमांकाच्या दोन दुचाकी समोरासमोर आल्या. हे पाहून मूळ मालक चक्रावला. आपल्याच नंबरची दुसरी गाडी पाहून त्याने माणसे गोळा केली आणि पोलिसांचा धावा केला. जमाव जमल्याचे पाहताच बनावट क्रमांक असलेली दुचाकी सोडून चालक पसार झाला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील पोलीस ठाण्यासमोरील एका हॉटेल समोर एकाच नंबरच्या दोन दुचाकी लागल्या. दुचाकीचा मूळ मालक असलेल्या डोंगरगाव पूल येथील नामदेव सोनाळे याने आपल्याच नंबरची दुसरी गाडी पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने बनावट नंबरची गाडी कोणाची आहे याचा शोध घेतला. परंतु, गाडीवर कोणी दावा केला नाही. अखेर त्याने आरडाओरड करत पोलिसांना पाचारण केले .एकाच नंबरच्या दोन दुचाकी पाहून पोलिसही संभ्रमात पडले. दोन्ही दुचाकी पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या.
दरम्यान, सोनाळे यांनी घरी जाऊन गाडीची मूळ कागदपत्र आणली. पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, पोका राजू जमदाडे, पोलीस कर्मचारी पातळे यांनी कागदपत्रांची तपासणी केली. गाडीचा चेसीस आणि इंजिन नंबर याची खात्री केल्यानंतर यातील एक गाडी सोनाळे यांची असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत फौजदार मुपडे म्हणाले की, बनावट क्रमांक टाकलेली दुचाकी एक रुग्णवाहिका चालक वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याला गाडीची कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली आहे. त्याने कळमनुरी येथून ही गाडी घेतल्याचे सांगितले. पुढील तपास सुरु आहे.