- रमेश कदम
आखाडा बाळापूर ( हिंगोली): रान डुक्कर अचानक पुढे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ( एम. एच .38 एडी 7394) पुलावरून थेट ओढ्यात कोसळता कोसळता राहिली. मात्र, कार पुलाच्या कठड्याला लटकत असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. हा अपघात आज, गुरुवारी ( दि. २४ ) पहाटे ५ वाजता बाळापुर गावाजवळ झाला. अपघातात चालक जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी ओढ्यावरील पुलाचे कठडे तुटलेले असल्याने छोटेमोठे अपघात होत असतात, आज पहाटे देखील कठडा नसल्यानेच कार खाली कोसळल्याचे नागरिकांनी सांगितले.
इरिगेशन कॅम्प ते बाळापूर जाणाऱ्या रस्त्यावर बाळापुरजवळ एक मोठा ओढा आहे. या ओढ्यावर पुल असून अनेक वर्षांपासून तयारील कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे येथे वारंवार अपघात घडत असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक कार ( एम.एच.38 ए डी 7394 ) या मार्गे बाळापूरकडे जात होती. यावेळी अचानक समोर रानडुक्कर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरून थेट ओढ्यात कोसळली. मात्र, कठड्याच्या एका अँगलला अडकल्याने कार कशीबशी पुलाला लटकली.
काच फोडून चालक बाहेरअपघात कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या अर्धवट फुटलेल्या काचा तोडून बाहेर पडत चालकाने आपला जीव वाचवला. यात चालकाच्या डोके, छाती, पायास गंभीर दुखापत झाली. दरम्यान, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला असला तरी पोलिसांना मात्र याची खबरबात नव्हती. दहा वाजण्याच्या सुमारास बीट जमादार शेख अन्सार घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी सदर गाडी ही कृष्णापूर येथील जितेंद्र पाईकराव यांच्या मालकीची आहे. चालकाकडून हा अपघात झाला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.