हिंगोली : मराठवाड्यातील १० लाख २४ हजार ग्राहकांकडे वीज बिलाची १,८७१ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांसाठी अभय योजना सुरु असून, त्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती महावितरणने दिली.
वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजना सुरु आहे. मराठवाड्यातील १० लाख २४ हजार ४०० ग्राहकांकडे १,८७१ कोटी ५१ लाख ५८ हजार रूपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांनी या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफीच्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.
थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत होता. त्याला आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळणार आहे, असे महावितरणने स्पष्ट केले.
आतापर्यंत झालेली वसुलीमराठवाड्यात १,८७१ कोटी रुपयांची थकबाकी असून, त्यात आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने ५ कोटी ६८ लाख, लातूर परिमंडळाने ४ कोटी ८१ लाख, नांदेड परिमंडळाने २ कोटी ५१ लाख असे १३ कोटी रूपये वसूल केले आहेत.