वसमत: तालुक्यातील कवठा फाट्यावर टेंम्पो व कारचा अपघात झाला. या अपघातात कारचा चुराडा झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना पोलिस व नागरिकांनी वेळीच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
कवठा फाट्यावर १५ मार्च रोजी सायंकाळी ५:५० वाजेदरम्यान औढ्या नागनाथकडून नांदेडकडे जाणाऱ्या कार ( क्र एम एच ३४ ऐएम ०२७७) व कुरुंद्याकडे जाणाऱ्या टेंम्पोचा ( क्र एम एच ३१ एफसी ३८९२) अपघात झाला. या अपघातात कार मधील देवकी रोहिदास चव्हाण वय ४२, रोहिदास वसाराम चव्हाण ( ४४, दोघे रा कटोळ ता जि नागपूर) ,गौरव सुरेश खांडेकर ( ३७, चामोरशी जि गडचिरोली) , रिनाद राकेश मुसे ( ३,रा नेरी ता. चिमूर जि चंद्रपूर), राकेश भास्कर भिसे ( ३४, रा.नेरी ता चिमूर जि चंद्रपूर) हे पाच जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे, जमादार अविनाश राठोड यांच्या सह आदि पोलीस कर्मचार्यांनी व उपस्थित नागरीकांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी देवकी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.