हिंगोली : सोयाबीनला असलेली मागणी व मिळालेला दर लक्षात घेता यावर्षी सोयाबीनचा पेरा २ लाख हेक्टरवर जाणार आहे. तर कापसाच्या लागवडीत घट होणार असून यावर्षी ३८ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यासाठी खत, बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे.
खरीप हंगामातील पेरणी जवळ आली असून कृषी विभागासह शेतकरी पेरणीपूर्व तयारी करीत आहेत. यावर्षी ४ लाख ११ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य प्रस्तावित केले आहे. सोयाबीनला मिळालेला दर लक्षात घेता यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी २ लाख ६३ हजार ६६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. त्या खालोखाल तूर ४० हजार ३९ तर कापसाची ३८ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्याखालोखाल मूग ७ हजार ७८८, ज्वारी ६ हजार ८९१, उडीद ६ हजार १२०, मका १ हजार ५०१, तीळ ३९, सूर्यफुलासाठी ५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या शिवाय २५ हेक्टरवर इतर पिकांचा पेरा अपेक्षित धरला आहे. त्यानुसार कृषी विभागाने खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आखले आहे.
बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध
यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज आहे. यासाठी १ लाख ९७ हजार ७५८ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. साधारणत: दरवर्षी शेतकरी घरचे बियाणे वापरतात. ३५ टक्केच शेतकरी नवीन बियाणे खरेदी करतात. त्यामुळे जवळपास ६९ हजार २१५ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध करून दिले जाणार असून १ लाख २८ हजार ५४२ क्विंटल बियाणे घरचे वापरले जाणार आहे. त्यामुळे बियाणाची टंचाई भासणार नाही, असा अंदाजही कृषी विभागाने लावला आहे. तसेच कापूस लागवडीसाठी जवळपास १ लाख ६१ हजार पाकिटे उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खासगी कंपनीच्या माध्यमातून इतर बियाणे उपलब्ध देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
७३ हजार १०५ मेट्रिक टन खताची गरज
खरीप हंगामासाठी गतवर्षी ६५ हजार मेट्रिक टन खत लागले होते. गतवर्षीचा अंदाज बघता यावर्षी ७३ हजार १०५ मेट्रिक टन खताची गरज लागणार आहे. सध्या युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी खताचा ३५ हजार ८६० मेट्रिक टन साठा शिल्लक असून आणखी युरिया व एनपीके खताच्या प्रत्येकी दोन रॅक मागविण्यात आल्या आहेत. या रॅकच्या माध्यमातून प्रत्येकी ५ हजार मेट्रिक टन खत तसेच डीएपी ४ हजार मेट्रिक टन खत लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. दरम्यान, डीएपी खताच्या उत्पादनासाठी लागणारा माल चीन देशातून येणे बंद झाल्याने डीएपी खताचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डीएपी खताचे दरही वाढले आहेत.
प्रतिक्रिया...
शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करताना बियाणाचा लॉट नंबर, विक्रेत्याची स्वाक्षरी यासह इतर प्रमुख तपशील असलेली पक्की पावती घ्यावी. तसेच डीएपी व युरिया खतात पांढरा किंवा काळा, बारीक किंवा ठोकर असा फरक न करता उपलब्ध असलेला माल पेरणीसाठी वापरावा. दोन्ही खतात सारखीच पोषणद्रव्ये असतात. तसेच कोरोनामुळे दुकानावर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सचे पालन करावे.
- निलेश कानवडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि. प. हिंगोली