लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील मोंढ्यात हमालांनी दर वाढीसाठी संप सुरू केला होता. या संपावर आमदार, सभापती व संचालक मंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून तोडगा निघाला व सहाव्या दिवशी मोंढ्यातील व्यवहार सुरू झाले. तब्बल सहा दिवस बंद असलेले काटे सोमवारी सुरू झाल्याने व्यापारी, हमाल व शेतकरी सर्वांची लगबग पहावयास मिळाली.वसमत मोंढ्यातील हमाल, मापाडी संघटनेने तब्बल सहा दिवस संप केला होता. हमालीचे दर वाढवावेत, अशी मागणी होती. त्यामुळे मोंढा ठप्प झाला होता. हा तिढा सोडविण्यासाठी माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा, आमदार राजू पाटील नवघरे, सभापती राजेश पाटील इंगोले, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, शिवदास बोड्डेवार आदींनी पुढाकार घेतला. संचालक मंडळाने बैठक घेऊन १३ टक्के दरवाढ देण्याचा निर्णय घेतला. दरवाढ करण्याचा निर्णय हमाल, मापाडी व व्यापारी यांनी मान्य करत कामकाज सुरू केले. सोमवारी मोंढ्यातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले. सोयाबीनचे काटे सुरू झाले. त्यामुळे सहा दिवसांपासून अडकून बसलेल्या शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात सभापती राजेश पाटील इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी १३ टक्के दरवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. तो निर्णय व्यापारी व हमाल, मापाडी यांनी मान्य करत सोमवारपासून कामकाज सुरू केले. संपामुळे मोंढ्यातील व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत होती. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची आम्ही दखल घेऊन सोमवारी कोणत्याही परिस्थितीत मोंढा सुरू होईल, याकडे लक्ष केंद्रीत केले होते. त्याप्रमाणे दोन्ही पक्षांनी सहकार्य केले व आज व्यवहार सुरळीत झाल्याचे सभापती राजेश पाटील इंगोले यांनी सांगितले.
सहा दिवसांनंतर काटे झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:20 IST