हिंगोली : येथील जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर टेस्टचे प्रमुख असलेले डॉक्टर आरटीपीसीआरचे सॅम्पल तपासणीसाठी शासकीय लॅबकडे न पाठविता परभणी येथील स्वत:च्या लॅबकडे पाठवित असल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेने केला असून, याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
येथील एका डॉक्टरांनी परभणी येथे कोणतीही परवानगी न घेता आरटीपीसीआर सॅम्पल तपासणी लॅब उभारले आहे. कोरोनाचे संयशित रुग्ण आरटीपीसीआर टेस्टसाठी आले असता त्यांचे सॅम्पल शासकीय लॅबकडे न पाठविता आपल्या खासगी लॅबकडे पाठवित आहेत. यातून सामान्य जनतेकडून कोरोनाच्या नावाखाली हजारो रुपये घेतले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब असताना व शासनाचा पगार असतानाही लोकांच्या जिवाशी खेळून स्वतःचा व्यवसाय चालविला जात असल्याचा आरोप करीत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या पाच दिवसांत भीमशक्तीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीमशक्तीचे मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, औंढा तालुकाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, युवराज ठोके, अविनाश सरकटे, सचिन भालेराव, सिद्धार्थ भारशंकर, जगन धबडगे, आदींनी दिला आहे.