हिंगोली: जिल्ह्यातील बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असून एक लाखावर उत्पन्न असल्यासही रेशन कार्ड रद्द होणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
केंद्र शासनाने यासंदर्भात राज्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
त्यासाठी अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार, तलाठ्यांच्या मदतीने बोगस शिधापत्रिकाधारकांचा शोध घेण्यात येणार आहे. यावेळी रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणाऱ्या तसेच पुरावा सादर न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची यादी तयार करण्यात येणार असून तशी यादी शासनाला सादर करण्यात येणार आहे. याचवेळी विदेशी नागरिकांकडे शिधापत्रिका आढळल्यास त्या शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्यात येणार आहेत. ही तपासणी मोहीम १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत जिल्हा प्रशासनाला पूर्ण करावी लागणार आहे. तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका विभक्त कुटुंबामध्ये देताना दोन्हीही शिधापत्रिका बीपीएल अथवा अंत्योदय अन्न योजनेच्या असणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ही समिती शिधापत्रिका तपासणीचा वेळोवेळी आढावा घेणार आहे.
हे पुरावे आवश्यक
शिधापत्रिका अर्जदारांना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारक ज्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. यासाठी भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, कार्यालयीन ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.
या कारणाने रेशनकार्ड होईल रद्द
शिधापत्रिका धारकांना रहिवासी असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. पुरावा सादर न केल्यास शिधापत्रिका रद्द होणार आहे. तसेच विदेशी नागरिक आढळून आल्यास शिधापत्रिका रद्द होणार आहे. तसेच ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील, खासगी कंपनीतील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. तसेच दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती, मयत व्यक्ती असल्यास अशा लाभार्थींच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत.
...तर रेशनकार्ड रद्द
शिधापत्रिका तपासणी केल्यानंतर पुरेसा पुरावा नसल्यास शिधापत्रिका त्वरित रद्द करण्यात येणार आहेत. तसेच निलंबित केलेल्या शिधापत्रिकाधारकांना पुरावा सादर करण्यास १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार मुदतवाढ देण्यात आली तरी पुरावा सादर न केल्यास अशा शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात अपात्र शिधापत्रिकांची विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. तसे पत्र जिल्ह्यातील तहसीलदारांना पाठविले आहे. बोगस शिधापत्रिका आढळल्यास अशा शिधापत्रिका रद्द केल्या जाणार आहेत.
अरुणा संगेवार,
जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली