शेनोडी -रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी रास्ता रोको आंदोलन

By विजय पाटील | Published: February 7, 2024 03:42 PM2024-02-07T15:42:16+5:302024-02-07T15:42:33+5:30

कळमनुरी तालुक्यात शेनोडी -रामवाडी ही उपसा जलसिंचन योजना इसापूर धरणावरून प्रस्तावित आहे.

Rasta Roko Andolan for Shenodi-Ramwadi Irrigation Scheme | शेनोडी -रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी रास्ता रोको आंदोलन

शेनोडी -रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी रास्ता रोको आंदोलन

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शेनोडी -रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी या परिसरातील नागरिकांनी मसोड फाटा येथे ७ फेब्रुवारी रोजी  रास्ता रोको आंदोलन करीत या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

निवेदनात म्हटले की, कळमनुरी तालुक्यात शेनोडी -रामवाडी ही उपसा जलसिंचन योजना इसापूर धरणावरून प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे १ हजार ५४८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या वेळी जलसंपदा विभागाने आश्वासन दिले होते. त्यात म्हटले होते की इसापूरच्या जलायशातून यापूर्वीच्या मंजूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित नसल्यामुळे त्या योजनांचे ७.६८ दलघमीपैकी ५.२८ दलघमी व ८५४ हेक्टर लाभक्षेत्र वगळल्यामुळे ६.३२ दलघमी असे ११.६० दलघमी पाणी शेनोडी-रामवाडी योजनेसाठी मंजूर होवू शकते. हे पाणी दिल्यास शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेल. राज्य शासनाने जलजीवन मिशन योजनेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव-हिमायतनगर तालुक्यांसाठी १३२ गावांची ग्रीड तर भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यांसाठी १८३ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजना कार्यान्वित करण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या गावांना नांदेड येथील विष्णुपुरी, बाभळी बंधारा किंवा गोदावरीचे पाणी वळवूनही पाणी देणे शक्य होते. मात्र त्यांना इसापूर धरणातूनच पाणी देण्याची तजविज केली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन याबाबत कोणतीच भूमिका घ्यायला तयार नाही. तर सापळीऐवजी खरबी बंधाऱ्यातून कयाधू नदीचे पाणीही इसापूर धरणात टाकण्याचा डाव आहे. त्यामुळे कयाधूच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे. खरबी बंधाऱ्यांतून पाणी देण्याचा निर्णय रद्द करून कयाधू नदीवर उच्च पातळी बंधारे उभारण्याची मागणीही केली आहे.  तर त्याला स्वयंचलित गेट बसविण्याची प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. यामध्ये कार्यवाही न झाल्यास २१ फेब्रुवारी रोजी शेनोडी येथे जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, मारोती खांडेकर, नंदकिशोर तोष्णीवाल, साहेबराव जाधव, शंकर सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, श्यामराव कांबळे, मयूर शिंदे, विनोद बांगर, उत्तम कुरवडे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Rasta Roko Andolan for Shenodi-Ramwadi Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.