हिंगोली : दहा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह सर्वदूर पाऊस पडला आहे. या दमदार पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.
गत दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे महागामोलाची उगविलेली पिके हाताला लागतील की नाही, अशी भीती वाटत होती. ४ सप्टेंबर रोजी म्हणजे पोळा सणाच्या दोन दिवस अगोदर पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. या दमदार पावसामुळे हळद, सोयाबीन, कापूस, तूर या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरीप हंगामात लाखो रुपयांची विविध कंपन्यांची बियाणे, खते वाया जातात की काय?, या चिंतेत शेतकरीवर्ग होता. याअगोदर जिल्ह्यात पाऊस झाला, पण तो म्हणावा तसा नव्हता, अशी प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुगाची काढणी आटोक्यात आहे. परंतु, उडदाची काढणी मात्र बहुतांश ठिकाणी सुरूच आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे उडदाच्या काढणीत व्यत्यय आला. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी उडीद पिकाची काढणी थांबविली आहे. दुसरीकडे काढणी चालू असताना पाऊस आल्याने त्याचा फटका उडदाला बसला आहे. जिल्ह्यातील जवळाबाजार, औंढा नागनाथ, नांदापूर, डोंगरकडा, कुरुंदा, पोत्रा, दांडेगाव, कळमनुरी, नर्सी नामदेव, डिग्रस कऱ्हाळे, डिग्रस कोंढूर, बाळापूर आदी गावांत पाऊस जोरदार पडला.
फुलोत्पादक शेतकरी सुखावला
गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे फुलोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. रोज ढगाळ वातावरण असायचे. परंतु, अचानक ढग गायब होऊन कडक ऊन पडत होते. दसरा, दिवाळी सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मागणी असते. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी झेंडू फुलाची लागवड केली आहे. दसरा, दिवाळीपर्यंत पाऊस पडतोय की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. शनिवारी पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.