हिंगोली जिल्ह्यात चार दिवसांनंतर बुधवारी सूर्यदर्शन झाले. सोमवारी रात्री तर जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारीही विविध भागात पावसाची रिपरिप दिवसभर सुरूच होती. बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे या पाण्याचा निचराही होत नसल्याचे दिसत आहे. शिवाय अनेकांचा काढणीतील उडीद व मूग या पावसामुळे वाया गेला आहे. अनेक ठिकाणी नदी, नाल्यांचे पाणी शेतात घुसूनही नुकसान झाले आहे. अशांच्या शेताचे पंचनामे करणे गरजेचे आहे. त्यातच ज्यांच्या पिकांची नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी दाखल करण्याची गरज आहे.
तालुकानिहाय हिंगोली १३.७० मिमी, कळमनुरी १५.१०, वसमत १६.४०, औंढा १५.८०, सेनगाव ३५.५० मिमी अशी काल पडलेल्या पावसाची सरासरी आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान जेवढे पर्जन्यमान अपेक्षित आहे, त्याच्या ११९ टक्के औंढ्यात तर १०८ टक्के पर्जन्य कळमनुरीत झाले आहे. हिंगोलीत ९३, वसमत ९० तर सेनगावात ९२ टक्के पर्जन्य झाले. मात्र सप्टेंबरपर्यंत अपेक्षित पावसाइतका पाऊस सर्वच तालुक्यांत झाला आहे.
वार्षिक सरासरी गाठली
गतवर्षी हिंगोली जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२४ टक्के पाऊस झाला होता. यंदा वार्षिक सरासरी आताच गाठलेली आहे. जर आणखी पाऊस झाला तर पुन्हा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होणार आहे. मागील दोन वर्षांपासून परतीच्या पावसाची हजेरी लागत आहे. ऑक्टोबरमध्येही पावसाने हजेरी लावल्याने सरासरी वाढत असल्याचे दिसते. यंदाही तीच परिस्थिती राहणार की कसे? हे आगामी काळात कळणारच आहे.