हिंगोली : हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले असले तरी पावसाचा अंदाज बांधताना अनेकवेळा त्यात तफावत आढळून येते. कित्येक वेळा हवामान खात्याचा अंदाजही चुकताे. मात्र, शेतकऱ्यांना अवगत असलेेले प्राचीन ज्ञान सहसा चुकत नाही. शेतकऱ्यांच्या शास्त्राला लिखित स्वरुप नसले तरी पावसाचे तंतोतंत भाकीत करणारी मंडळी ग्रामीण भागात आजही आढळून येतात. एकंदर पुनर्वसू नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
यावर्षी २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला. रोहिणी नक्षत्राचा पाऊस हा जमिनीतील धूप कमी करणारा असल्यामुळे या नक्षत्रात कोणताही शेतकरी पेरणी करत नाही. रोहिणी नक्षत्राच्या पावसापूर्वी शेतकरी शेतीची मशागत करून घेतो. मृग नक्षत्रात पाऊस पडल्यानंतर चार-पाच दिवसांनी खरिपातील पेरणीला सुरुवात केली जाते. यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुगाची पेरणीही केली. परंतु, मृग नक्षत्रानंतर आलेल्या आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे कोवळी पिके आता तग धरू लागली असून, कोरडवाहू शेतातील पिके कोमेजून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
पुनर्वसू नक्षत्र ५ जुलैपासून सुरू झाले असून, याचे वाहन ‘उंदीर’ आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. गतवर्षी पुनर्वसू नक्षत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे पिकेही बहरून आली होती. पुनर्वसूच्या पावसामुळे यावर्षीही पिके बहरतील, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
गत काही वर्षांपासून पावसाची नक्षत्रे अनियमित झाली आहेत. जंगलतोड, प्रदूषण, तापमानात वाढ आणि हवामानातील बदल या कारणांमुळे निसर्गाची व्यवस्था नष्ट होऊ पाहात आहे. मागील २५ वर्षांपासून पावसाची नक्षत्रे अनियमित झाली आहेत. एकूण २७ नक्षत्रांपैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उतरा, हस्त ही पावसाची नक्षत्रे आहेत. या ९ नक्षत्रांमध्ये पिकांना पाहिजे तेवढा भरपूर पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
नक्षत्र आणि वाहन
मृग-गाढव
आर्द्रा-कोल्हा
पुनर्वसू- उंदीर
पुष्य- घोडा
आश्लेषा - मोर
मघा - गाढव
पूर्वा - बेडूक
उतरा - म्हैस
हस्त - घोडा
शेतकरी काय म्हणतात...
गत कित्येक वर्षांपासून नक्षत्रांवर पेरणी करत आलो आहे. यावर्षीही मृग नक्षत्राच्या पावसावरच खरीप पेरणी केली आहे. पुनर्वसूत चांगला पाऊस पडेल, अशी आशा आजतरी आहे.
- बाबाराव सुरुशे, डिग्रस
हवामान खाते पावसाचा अंदाज बांधते. परंतु, पाऊस अंदाजाप्रमाणे काही पडत नाही. त्यामुळे नक्षत्रांवरच शेतकरी पेरणी उरकून घेतात. नक्षत्र हे शास्त्र लिखित नसले तरी पावसाची हमी मात्र आहे.
- राजेश सुरोशे, कुडाळा
मृग नक्षत्रावर कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी खरीप पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. आर्द्रा नक्षत्रापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. पुनर्वसू नक्षत्रात भरपूर पाऊस पडून पिकांना जीवदान मिळेल आणि शेतकरी आनंदी होईल.
- कैलास महाजन, टाकळी
फोटो