हिंगोली येथे छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सर्वधर्म समावेशक अशा सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. १९ फेबुवारी शिवजयंतीनिमित्त तयारी सुरू आहे. हिंगोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी महिलांना संधी देऊन समाजापुढे वेगळा आदर्श उभा करण्याचा प्रयत्न महोत्सव समितीने केला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी अनेकांनी इच्छुकता दाखविली. यामुळे समितीच्यावतीने त्यांच्या नावाने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी छायाताई मगर यांची वर्णी लागली तर कार्याध्यक्षपदी सुनीताताई मुळे, सचिवपदी ज्योतीताई कोथळकर, तर कोषाध्यक्षपदी विद्याताई पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित महिलांची कार्यकारिणी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे.
बैठक
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या तयारीसाठी गुरुवारी २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एनटीसी परिसरातील छत्रपती शिवाजीराजे उद्यान येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाची विस्तृत रूपरेषा या बैठकीत ठरविण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाभरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा छायाताई मगर यांनी केले आहे.