वसमत : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात कसूर करून प्रशिक्षण शिबिरास गैरहजर राहणाऱ्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश तहसीलदारांनी काढले आहेत. तहसीलदारांनी वसमत शहर पोलिसांना दिलेल्या पत्राद्वारे कारवाई करण्याचे आदेशित केले आहे.
वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर २२ डिसेंबर रोजी घेण्यात आले. या शिबिरास सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक के. बी. फिसके, पी. जी. मुत्तेवार, के. एस. दुधमाळ हे गैरहजर होते. निवडणूक कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप तहसीलदारांनी करीत त्यांच्यावर निवडणूक कामात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश काढले आहेत. तहसीलदारांच्या या आदेशाने खळबळ उडाली आहे. या आदेशानंतर शिबिरास गैरहजर राहणारे कर्मचारी, अधिकारी निवडणूक विभागात हजर झाल्याचे वृत्त आहे. वसमत तालुक्यातील अप-डाऊन करणारे कर्मचारी निवडणूक कामांतून अंग काढून घेण्यासाठी विविध कारणे शोधत असतात. मात्र, तहसीलदारांनी कडक भूमिका घेतल्याने अप-डाऊन करुन निवडणुकीचे कामकाज सांभाळण्याची कसरत करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.