वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील सिंदगी घाट येथून वसमतकडे भुसा घेऊन येणारा पिकअप टेम्पो सिंदगी घाटात उलटून आज सकाळी साडेआठ वाजे दरम्यान झाला. यात पिकअप टेम्पोमधील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उगम फाटा ते आसेगाव मार्गावरील सिंदगी घाटात आज सकाळी, बुधवारी ( दि. १२) सकाळी ८:३० वाजे दरम्यान वसमतकडे भुसा घेऊन जाणारा पिकअप टेम्पो (क्र एम एच २९ एम १४३२) उलटला. या अपघातात पिकअप टेम्पोमधील पळसगाव येथील २८ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे पिकअप टेम्पोबाहेर रस्ताच्या कडेला फेकले गेल्याने गंभीर जखमी आहेत. बाळू हिरामण भुतकर ( ३०) , पवन नागोराव खारोडे ( २३. दोघे रा मुरुंबा) अशी जखमींची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे, बालाजी जोगदंड, संतोष पटवे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.