हिंगोली : जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामात गैरप्रकार झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी ८ जानेवारी रोजी चक्क जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
हिंगोली तालुक्यातील नांदुरा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम झाले आहे. काम पूर्ण होऊनही ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. आठवडाभरापूर्वी येथील महिलांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला होता. मात्र प्रशासन हलले नाही. त्यामुळे ७ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता.
नांदुरा येथे झालेल्या जलजीवन मिशनच्या कामात गैरप्रकार झाला आहे. खरेदीखत एका गट क्रमांकाचे आणि विहीर दुसऱ्या गट क्रमांकात घेतली आहे. तसेच इतरही अनेक त्रुटी असून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत नाही. तेव्हा योजनेची चौकशी करून पाणी उपलब्ध करावे, या मागणीसाठी ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महिला, पुरुषांनी जलजीवन मिशनच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. काही महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर साधारण एक तासाने प्रशासनाने दखल घेतली. या संदर्भात कारवाईच्या आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे नांदुरा ग्रामपंचायत येथे ८ जानेवारी रोजी उपोषणकर्त्या महिला, पुरुषांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. गावाला दररोज पाणी सोडले जाईल, विहिरीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या पाईपलाईनचे काम तसेच गावातील वितरण व्यवस्थेतील गळती काढल्या जातील. ही सर्व कामे करण्यासाठी एक महिन्याचा अवधी पाणीपुरवठा विभागाला द्यावा, असे उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. एक महिन्याच्या आत सर्व कामे करण्याचे लेखी आश्वासन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच चौकशी अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले, अशी माहिती संदीप तनपुरे, सुरेश तनपुरे व ग्रामस्थांनी दिली.