हिंगोली नगरपालिकेकडे वर्षानुवर्षांपासून असलेली थकबाकी ३३ कोटी रुपयांची आहे. ती पूर्णपणे भरणे पालिकेला शक्यही नाही. मात्र शासनाच्या व्याज सवलत योजनेत माफी मिळाल्यानंतर एकदा ही थकबाकी भरण्याचा प्रयत्न केला होता. त्यात यश आले नाही. आता या थकबाकीमुळे चालू थकबाकी थोडीही वाढली की, महावितरणकडून वीजजोडणी तोडण्यात येते. पाणीपुरवठा योजनेचे देयक मागील तीन महिन्यांत एकदाही भरले नाही. त्यामुळे थकबाकी ५० लाखांच्या पुढे सरकली आहे. त्यामुळे महावितरणने सिद्धेश्वर येथील पंप व डिग्रस कऱ्हाळे येथील शुद्धीकरण केंद्राची वीज तोडली आहे. आधीच लिंबाळ्यानजीक पाणीपुरवठा योजनेची वाहिनी फुटल्याने पाणी वाया जात असल्याने उपसा बंद होता. त्यात पुन्हा आता वीज तोडल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
पथदिव्यांचीही वीज तोडणार
याबाबत विचारले असता उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे म्हणाले की, पाणीपुरवठा योजनेचेच नव्हे तर पालिकेने पथदिव्यांचेही देयक भरले नाही. दोन दिवसांत पथदिव्यांचीही वीज तोडणार आहोत. पथदिव्यांची जुनी साडेसात कोटी तर चालू थकबाकी २० ते २५ लाखांची आहे.
महावितरण
महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव हे फोन उचलत नाहीत. आमचे कर्मचारी गेले तर त्यांना त्यांच्यासह इतर कुणी प्रतिसाद देत नाही. बिलसुद्धा दिले जात नाही. ऑनलाइन काढण्यास सांगितले जाते. १५व्या वित्त आयोगाचा हप्ता मिळताच चालू थकबाकी पूर्ण भरणार असल्याचे लेखी कळविलेले आहे. तरीही नाहक अडवणूक करून नागरिकांना वेठीस धरत आहेत, असे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सांगितले.