हिंगोली : येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचा कारभार कर्मचाऱ्यांवर सोपवून अधिकारी परभणीतून कारभार पाहत आहेत. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी माहिती व सुविधा मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत.
हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या लिंबाळा मक्ता येथे लाखो रूपये खर्चून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय उभारण्यात आले आहे. तसेच खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिसरात रनिंग ट्रॅकसह मिनी स्टेडियम उभारून प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली. जलतरणिकेसह स्वच्छतागृहही उभारण्यात आले आहे. खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने चांगले खेळाडू घडतील अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथील क्रीडाधिकारी परभणीहून कामकाज पाहत असल्याने कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. याचा फटका खेळाडू, कामानिमित्त येणाऱ्यांना बसत आहे. दिवसभर थांबूनही अधिकारी, कर्मचारी भेटत नसल्याने आल्या पावली परतावे लागत आहे. अधिकारी कार्यालयाकडे फिरकत नसल्याने जिल्हाभरात असलेल्या व्यायाम शाळांची तपासणी होते की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, अधिकारी, कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने कार्यालय परिसराला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. मैदानाचा तर पाच वर्षापासून वापर झाला नसल्याचे दिसत आहे. लाखो रूपये खर्चूनही खेळाडूंना योग्य सुविधा मिळत नसल्याने यातून खेळाडू कसे घडतील, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
स्टेडियम बनले खंडर
योग्य नियोजन व देखभाल नसल्याने लाखो रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहाचे दरवाजे गायब झाले आहेत. स्वच्छतेचा अभाव असल्याने खंडरचे स्वरूप आले आहे.
जलतरणिकेची दुरवस्था
जिल्ह्यातून जलतरणपटू घडावेत, यासाठी अद्ययावत जलतरणिका उभारण्यात आली आहे. मात्र देखभालीअभावी जलतरणिकेची दुरवस्था झाली असून कपडे बदलण्याच्या खोल्यात टाकाऊ वस्तू काेंबल्या आहेत.
फोटो