हिंगोली : गत चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात झालेल्या सिद्धेश्वर व इसापूर धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. इसापूर धरणाचे ११ गेट दीड मीटरने तर २ गेट एक मीटरने तर सिद्धेश्वर धरणाचे १२ एक मीटरने सोडले आहे. ईसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत तर सिद्धेश्वर धरणाचे पाणी पूर्णा नदीत सोडले आहे. जिल्ह्यात १५ पासून पाऊस सुरू आहे. जलसंपदा विभागातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे सिंचन अवलंबून असलेले औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सिदेश्वर धरणाचे दरवाजे १२ दरवाजे उघडण्यात आले. पूर्णा प्रकल्पाचे मुख्यसाठा असलेल्या येलदरी धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे विद्युत् निर्मिती प्रकल्पाद्वारे येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात विसर्ग सोडण्यात येत आहे.
तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेले अतिवृष्टीमुळे सिद्धेश्वर धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याचा येवा येत आहे. त्याअनुषंगाने रविवारी धरणाचे १४ पैकी ८ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणात होत असलेल्या पाण्याच्या आवक नुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागामार्फत देण्यात आली असून नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा व तालुका महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.