- विश्वास साळुंके वारंगा फाटा (जि. हिंगोली) - कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे १७ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे ग्रामस्थ रस्त्यांवर येऊन उभे राहिले. भूकंपाच्या धक्क्यामुळे ग्रामस्थांत भिती निर्माण झाली होती.
मागील काही वर्षांपासून दांडेगाव आणि परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. हे धक्के कधी पहाटेच्यावेळी, कधी दुपारच्यावेळी तर कधी सायंकाळच्यावेळी जाणवतात. मंगळवारी बसलेला धक्का हा रात्री ९:०१ वाजेदरम्यान जाणवला. मंगळवारच्या भूकंपाची तीव्रता जास्त नसल्याने काहींना तो समजला देखील नाही. यापूर्वी १७ व २२ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास दांडेगाव आणि परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मंगळवारी झालेल्या सौम्य धक्क्याने जमीन थोड्या प्रमाणात हादरून गेल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट सुरू झाली. पाच ते दहा मिनिटांत दांडेगाव येथील लहान-मोठे ग्रामस्थ रस्त्यांवर येऊन उभे राहिले. चार दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत असल्यामुळे काही ज्येष्ठ ग्रामस्थ ब्लँकेट पांघरूण घेऊन रस्त्यांवर आल्याचे पाहायला मिळाले. वारंवार होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. दरम्यान, कोणत्याही प्रकारचा भूकंप झाला नसून त्याची नोंदही कुठे झाली नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.